भरधाव बीएमडब्ल्यू कार आयशरवर धडकल्याने चौघे जागीच ठार
Four killed on the spot after speeding BMW car hits Eicher लातूर (7 मार्च 2026) : लाकडाची वाहतूक करणार्या आयशर टेम्पोला जावून भरधाव बीएमडब्ल्यू धडकल्याने झालेल्या अपघातात चौघे ठार झाले. हा अपघात लातूर जिल्ह्यातील औसा शहराजवळील औसा-तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री घडला. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले.
असा घडला अपघात
सांगली येथील कार (एम.एच.04 ई.जी.7500) काही कामानिमित्त लातूरला आली होती. काम आटोपल्यानंतर शिवली येथे जेवण केल्यानंतर सहकार्याला सोडण्यासाठी ही कार औशाकडे येत असतानाच एका हॉटेलसमोर पुढे चाललेल्या लाकडाने भरलेल्या ट्रकला (एम.एच.25 यू.0522) व कंटेनर (एम.एच.12 एफ.सी.7642) पाठीमागून कारने धडक दिली. त्यानंतर लाकडी ट्रक शंभर फूट पुढे जाऊन उलटला, तर कार पूर्णपणे चक्काचूर होऊन रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली.


चौघे जागीच ठार
या अपघातात कार चालक धनराज काशीनाथ जाधव (49, रा. सांगली), आबासाहेब साळुंके (36), शुभम शेषेराव पाटील (26), किसन रामलिंग साळुंके (49, तिघेही रा. बोरगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातात जयहिंद विश्वास जाधव (30, रा. औसा) आणि विनायक श्रीकांत हालदर (28, रा. सांगली) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सांगली येथील धनराज जाधव हे व्यापारी होते. बोरगाव येथील तरुणांच्या मदतीने ते औसा तालुक्यासह जिल्ह्यात व्यवसायाचे जाळे निर्माण करीत होते.
दरम्यान, अपघाताची माहिती कळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य करून जखमींना रुग्णालयात हलवले. दरम्यान, अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.







