सव्वा कोटींच्या लाच प्रकरणात नाशिकमध्ये जीएसटी विभागाच्या राज्य कर उपायुक्तासह तिघे एसीबीच्या जाळ्यात
Three people, including the State Tax Deputy Commissioner of GST Department, are in the net of ACB in Nashik in a bribery case of Rs. 1.25 crore. नाशिक (7 मार्च 2026) : नाशिकमध्ये मुंबई एसीबीने मोठी कारवाई केली असून या कारवाईने जीएसटी विभागातील लाचखोर अधिकार्यांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयात सापळा रचून सव्वा कोटी रुपयांची लाच मागून पहिल्या हप्त्यापोटी 20 लाखांची लाच स्वीकारताना राज्यकर विभागातील दोन वरिष्ठ अधिकार्यांसह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. या कारवाईने जीएसटी विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
या संशयीतांना अटक
राज्य कर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे (47), सहाय्यक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे (55) व खाजगी व्यक्ती अमित हिरामण जाधव (36) अशी अटकेतील संशयीतांची नावे असून पागे हे दिंडोरी रोड परिसरातील म्हसरूळ येथे तर दोंदे हे गंगापूर पोलीस ठाण्याच्या मागील भागात राहतात. जाधव हा सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरातील रहिवासी आहे.


असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराचे शहरातील दामोदर चौक परिसरात कार्यालय आहे. या कार्यालयावर संशयित अधिकार्यांनी जीएसटी संदर्भात कारवाई केली. या प्रकरणातील तपास लवकर पूर्ण करून देण्यासाठी राज्यकर उपायुक्त पागे आणि सहाय्यक आयुक्त दोंदे यांनी तक्रारदाराकडे एक कोटी 25 लाख रुपयांची लाच मागितली मात्र तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने प्राथमिक पडताळणी केली असता, अधिकार्यांनी तक्रारदाराशी तडजोड करत एक कोटी रुपयांवर व्यवहार निश्चित केल्याचे उघड झाले. त्यातील पहिला हप्ता म्हणून 20 लाख रुपये देण्याचे ठरले.
20 लाखांची रक्कम स्वीकारताना पकडले रंगेहात
एसीबीच्या पथकाने शुक्रवारी पाथर्डी फाटा येथील जीएसटी कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने 20 लाख रुपयांची रक्कम दिल्यानंतर ती खाजगी व्यक्ती अमित जाधव याने पागे आणि दोंदे यांच्या वतीने स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने जाधवला रंगेहात पकडले. त्यानंतर राज्यकर उपायुक्त पागे आणि सहाय्यक आयुक्त दोंदे यांनाही ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, एसीबीच्या झडतीत सोमनाथ पागे यांच्या कार्यालयात दोन लाख रुपयांची रोकड आढळून आली. ही रक्कम पथकाने जप्त केली आहे. तसेच संशयितांचे मोबाईल फोनही तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत. तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त विजय चव्हाण यांनी पथकासह केली. अपर पोलीस उपायुक्त अनिल घेरडीकर आणि पोलीस निरीक्षक मोहन जगदाळे यांनी पर्यवेक्षण केले.







