शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सावधान ! जळगावात बीएसएफ जवानाला 25 लाखांचा गंडा
Be careful while investing in the stock market! BSF jawan robbed of Rs 25 lakhs in Jalgaon जळगाव (7 मार्च 2026) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने अनेकांना गंडवले जाते मात्र त्यानंतरही जादा नफ्याच्या आमिषाने अनेकजण या आमिषाला भाळतात व आहे ती रक्कमही गमावून बसतात. याचाच प्रत्यय जळगावातील बीएसएफ जवानाला आला असून या प्रकरणात तब्बल 24 लाख 82 हजार 256 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. जळगाव सायबर पोलिसांकडून आता या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
असे आहे नेमके प्रकरण ?
अमळनेर तालुक्यातील वावडे येथील रहिवासी असलेले देविदास बारीकराव पाटील (44) हे सध्या पश्चिम बंगाल येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. 22 सप्टेंबर 2025 रोजी ते युट्यूबवर रिल्स पाहत असताना त्यांना 22 हजार रुपये गुंतवल्यास पैसे दुप्पट होतील, अशी एक लिंक दिसली. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. समोरील व्यक्तीने आपण डेहराडून येथून बोलत असून मॉरिशस येथील ‘ट्रेडग्रीप’ नावाच्या शेअर मार्केट कंपनीशी संबंधित असल्याचे भासवले.


भामट्यांनी पाटील यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना ‘ट्रेडग्रीप क्लाइंट’ नावाचे अॅप डाऊनलोड करायला लावले. सुरुवातीला 20 हजार 999 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1,331 रुपये नफा दाखवून त्यांचा विश्वास जिंकला. त्यानंतर 22 सप्टेंबर 2025 ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीत विविध शेअर्समध्ये अधिक नफ्याचे आमिष दाखवून जवानाला वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण 24 लाख 82 हजार 256 रुपये भरण्यास प्रवृत्त केले.
जेव्हा पाटील यांनी आपली मूळ रक्कम आणि नफा परत मागितला, तेव्हा आरोपींनी त्यांना आणखी पाच लाख रुपये भरण्यास सांगितले. पैसे न भरल्यास पोर्टफोलिओ स्क्रॅप करण्याची आणि कंपनीचे नुकसान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची धमकीही दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी तत्काळ सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवली. तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.







