आठ गावठे कट्टे, दहा जिवंत काडतूसांसह जळगाव, धुळे व बर्‍हाणपूर परिसरातील कट्टे विक्रेते व खरेदीदार पोलिसांच्या जाळ्यात


Eight village knives, ten live cartridges, knife sellers and buyers from Jalgaon, Dhule and Burhanpur areas caught by police जळगाव (8 मार्च 2026) : गावठी शस्त्रांची तस्करी करणार्‍यांसह अवैधरित्या हे शस्त्र खरेदी करणार्‍यांवर जळगाव जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करीत सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून दहा जिवंत काडतूस तसेच आठ गावठी कट्टे जप्त करण्यात आले. एकूण 3.10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त जळगाव जिल्हापेठ पोलिसांनी जप्त केल्याने अवैध शस्त्र तस्करांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत यश रामदास नन्नवरे हा जळगावातील इंडिया गॅरेज परिसरात गावठी पिस्टल बाळगत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचत भज्जी गल्ली परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्टल मिळून आले.



पोलिसांनी यश नन्नवरे याची कसून चौकशी केली असता त्याने ही पिस्टल वरणगाव येथील केशव सुनिल भालेराव याच्याकडून घेतल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी केशव भालेराव याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने ही पिस्टल समाधान बळीराम निकम (रा.अंजाळा, ता.यावल) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समाधान निकम याचा शोध घेतला असता तो जामनेर तालुक्यातील नेरी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. चौकशीदरम्यान त्याने मध्यप्रदेशातून गावठी पिस्टल आणून विविध ठिकाणी विक्री करत असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून अनेकांना पिस्टल विकल्याचे समोर आले.

सात आरोपींविरोधात गुन्हा : सहा अटकेत
गावठी पिस्टलाची अवैधरित्या खरेदी व विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी यश रामदास नन्नवरे (27, धनगर बिल्डींग, जळगाव), केशव सुनील भालेराव (23, वरणगाव), गौरव देविदास साळवे (22, पिंप्राळा, जळगाव), समाधान बळीराम निकम (40, अंजाळा, ता.यावल), विकास प्रकाश काकडे (28, साळशिंगी, ता.बोदवड), जगदीश गजानन महाजन (20, बंबाळा फाटा, शाहपूर, जि.बर्‍हाणपूर), कैलास राजेंद्र माळी (20, बोरकुंड, जि.धुळे) यांच्याविरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून केशव भालेराव व्यतिरिक्त सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एकूण आठ गावठी पिस्टल, दहा जिवंत काडतुसे आणि एक होंडा युनिकॉर्न दुचाकी (क्रमांक एम.एच.19 सी.बी.1312) जप्त करण्यात आली आहे. जप्त शस्त्रांची अंदाजे किंमत प्रत्येकी सुमारे 35 हजार रुपये असून एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे तीन लाख 10 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संशयीतांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
या आरोपींपैकी काही जणांविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. मुख्य आरोपी समाधान निकम हा पाचोरा पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न आणि यावल पोलीस ठाण्यातील आर्म अ‍ॅक्टच्या गुन्ह्यातही हवा असलेला आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले तसेच केशव भालेराव याच्याविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांमध्येही तो वाँटेड असल्याची माहिती मिळाली आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, महेश महाजन, नरेश सोनवणे, संदीप परदेशी, भरत चव्हाण, तसेच पोलीस कर्मचारी राहुल पाटील, समाधान पाटील, तेजस मराठे, ईश्वर खवडे आणि नरेंद्र दिवेकर आदींच्या पथकाने केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !