भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात महिला दिन उत्साहात


भुसावळ (9 मार्च 2026) : भुसावळातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 7 मार्च 2026 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनावरिष्ठ विभाग, कनिष्ठ विभाग व युवती सभा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी इतिहासकाळातील व वर्तमान काळातील कर्तबगार स्त्रियांची वेशभूषा करून त्यांच्याबद्दल सभागृहास माहिती दिली. यात राष्ट्रमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई,सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, रमाबाई आंबेडकर, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, सिंधुताई सपकाळ इत्यादींच्या भूमिका साकारण्यात आल्या.

युवती सभा प्रमुख प्रा.दीपाली पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ. जीवन धांडे होते. त्यांनी हवामान बदल, वनसंवर्धन व शाश्वत विकासासाठी महिलांनी केलेले प्रयत्न व पर्यावरण संवर्धनात महिलांचा सहभाग याविषयी विविध उदाहरणे दिली. महिलांनी स्वावलंबन आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये सक्रिय भूमिका घ्यावी व महिलांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे नमूद केले.

याप्रसंगी वरिष्ठ विभाग राष्ट्रीय सेवा योजनेने वर्षभरात राबवलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.मीना चौधरी यांनी सर्व सहभागी व पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनींचे कौतुक केले.

सूत्रसंचालन माधुरी बोयत व रक्षंदा जैन या विद्यार्थिनीने केले. यशस्वीतेसाठी प्रा.उज्वला महाजन, प्रा.मुक्ती जैन, प्रा.निलेश गुरुचळ, प्रा.एस.बी.नेतनराव, प्रा.श्वेता नागला यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.माधुरी भुतडा, इतर महिला प्राध्यापक वर्ग, आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !