भुसावळातील साहित्यिक सीमा भारंबे यांच्या साहित्याचा गौरव
भुसावळ (9 मार्च 2026) : परदेशात एखाद्या साहित्यिक किंवा कलावंताच्या घरावर सांस्कृतिक वारसा म्हणून निळ्या रंगाची पाटी लावली जाते. त्याचप्रमाणे भुसावळ नगरपरिषदेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संतोषी माता हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात सांस्कृतिक वारसा चिन्हाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते रविवार, 8 मार्च रोजी करण्यात आले.
याप्रसंगी भुसावळ शहराच्या प्रथम नागरिक स्वतः नगराध्यक्ष गायत्री भंगाळे, ललिता चौधरी यांनी साहित्यिक सीमा भारंबे यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांस्कृतिक व साहित्याची ओळख म्हणून निळ्या रंगाची पाटी लावली.
यावेळी शहरातील अनेक महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. प्रा.उत्तम सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. शहरात लेखिका सीमा भारंबे यांच्या निवासस्थानाला प्रथमच सांस्कृतिक वारश्याचा दर्जा दिला गेल्याने शहरातील मान्यवरांकडून साहित्यिक सीमा भारंबे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.







