महाराष्ट्र होरपळणार ! ‘तीव्र उष्णतेची लाट’
मुंबई (9 मार्च 2026) : राज्यात सूर्य आग ओकू लागला असून हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांसाठी ’तीव्र उष्णतेच्या लाटेचा’ इशारा जारी केला आहे. 9 आणि 10 मार्च हे दोन दिवस अत्यंत कठीण राहण्याची शक्यता आहे. एकीकडे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दमट हवामानामुळे नागरिक हैराण होणार असतानाच, सिंधुदूर्ग, कोल्हापूर-सांगली भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये 9 मार्च रोजी ‘उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट’ येण्याची 51 ते 75% शक्यता आहे. 10 मार्च रोजी देखील या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण विभाग : तीव्र उष्णतेचा इशारा
पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड: या जिल्ह्यांत 9 मार्च रोजी ’तीव्र उष्णतेची लाट’ येण्याची शक्यता आहे. 10 मार्च रोजी देखील येथे उष्णतेची लाट कायम राहील.
रत्नागिरी : येथे 9 आणि 10 मार्च रोजी हवामान अत्यंत उष्ण आणि दमट असेल.
सिंधुदुर्ग : 9 मार्च रोजी येथे हलक्या पावसाची शक्यता असून त्यानंतर हवामान कोरडे राहील.
उत्तर महाराष्ट्र : उष्ण आणि दमट हवामान
धुळे आणि नंदुरबार: 9 मार्च रोजी येथे उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव : 9 आणि 10 मार्च अशा दोन्ही दिवशी येथे उष्ण आणि दमट हवामान असेल.
नाशिक : 9 मार्च रोजी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे.
विदर्भ : उष्णतेची लाट
अकोल : 9, 10 आणि 11 मार्च असे सलग तीन दिवस येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
अमरावती : 9 आणि 10 मार्च रोजी येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
वर्धा : 10 आणि 11 मार्च रोजी या जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर: या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.







