आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर उच्चांकावर ; देशात इंधन दर वाढणार नसल्याचा सरकारचा दावा
नवी दिल्ली (9 मार्च 2026) : मध्य पूर्वेत अमेरिका-इस्त्राईल आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (क्रूड ऑइल) दर साडेतीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. सोमवार, 9 मार्च रोजी ब्रेंट क्रूडची किंमत 100 डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर गेली आहे. यापूर्वी 2022 मध्ये कच्च्या तेलाने 100 डॉलरचा टप्पा ओलांडला होता.
युद्धादरम्यान म्हणजेच अवघ्या 10 दिवसांतच कच्च्या तेलाचे दर सुमारे 48 टक्के नी वाढले आहेत. तथापि, भारत सरकारचे म्हणणे आहे की आपल्याकडे पुरेसे तेल आहे त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत.
होर्मुज जलमार्ग बंद झाल्याने संकट अधिक गडद झाले
जगातील एकूण तेल व्यापाराचा एक मोठा भाग होर्मुज सामुद्रधुनीतून जातो. इराणमधील युद्धामुळे या सागरी मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे आखाती देशांकडून होणारा तेलाचा पुरवठा थांबला आहे. यूएई आणि कुवेतसारख्या मोठ्या तेल उत्पादक देशांनीही त्यांचे उत्पादन कमी करण्यास सुरुवात केली आहे, कारण पुरवठा मार्ग बंद झाल्याने निर्यात करणे कठीण होत आहे.
आमच्याकडे पुरेसे तेल आहे, पेट्रोल-डिझेल महाग होणार नाही
भारत सरकारने 8 मार्च रोजी सांगितले होते की, भारताला कच्च्या तेलाची कमतरता भासणार नाही. भारताकडे सध्या कच्च्या तेलाचा आणि रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांचा 25 कोटी बॅरल (सुमारे 4,000 कोटी लिटर) पेक्षा जास्त साठा आहे.
सरकारच्या अहवालानुसार, हा बॅकअप इतका आहे की जर पुरवठा पूर्णपणे थांबला तरीही देशाची संपूर्ण पुरवठा साखळी 7 ते 8 आठवडे सहज चालू शकते. म्हणजेच, येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या कमतरतेची कोणतीही चिंता नाही. सरकारने 7 मार्च रोजी स्पष्ट केले होते की पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले जाणार नाहीत.
भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणार
अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने भारतीय रिफायनरीजना 30 दिवसांचा विशेष परवाना दिला आहे. हा परवाना 3 एप्रिलपर्यंत वैध राहील. यामुळे भारतात कच्च्या तेलाची कमतरता भासण्याची शक्यता नाही. याशिवाय, पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याचे संकट सध्या संपले आहे.







