नैसर्गिक मृत्यूला अपघात दर्शवून 50 लाखांचा विमा लाटण्याचा प्रयत्न : मेहुणबार्‍यातील चार पोलिसांसह आठ संशयीतांना अटक

बनावट विमा लाटणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय : पोलिस तपासात अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता


चाळीसगाव (9 मार्च 2026) : प्रौढाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही त्याचा अपघात दर्शवून 50 लाखांचा विमा लाटण्याच्या प्रयत्नातील कुटूंबासह या प्रकरणातील मृत्यूचा दाखला देणारे वैद्यकीय अधिकारी तसेच प्रकरणात सहकार्य करणार्‍या चार पोलिस मिळून एकूण आठ संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारानंतर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली असून चाळीसगाव तालुक्यात एलआयसी विमा लाटणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय बळावला आहे. आरोपींच्या चौकशीत त्यांनी अशा पद्धत्तीने आणखी काही दाव्यांमध्ये रक्कम मिळवली असल्याचा संशय असून या दृष्टीने सखोल चौकशीची मागणीची होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण
चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर राजेंद्र शालंदर जाधव (मालेगाव) यांचा 19 एप्रिल 2025 रोजी मृत्यू झाला होता. मृतासोबत असलेले सहदुचाकीस्वाराने मेहुणबारे पोलिसात अपघाताची तक्रार नोंदवली होती. मयत हे दुचाकी (एम.एच.41 बी.क्यू.2817) द्वारे जात असताना दहिवद येथून मालेगावकडे जात असलेल्या थार (क्र. एम एच 19 डीव्ही 0505) ने धडक दिल्याने राजेंद्र जाधव यांना गंभीर दुखापत झाली व त्यांचा ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे मृत घोषित करण्यात आल्याचे पोलिस तक्रारीत नोंदवण्यात आले होते.

अपघातानंतर विम्याचा दावा मात्र कंपनीला आला संशय
राजेंद्र शालिंदर जाधव यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारस पत्नी अरुणा जाधव यांनी श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी लि. कडे 50 लाखांच्या पर्सनल एक्सीडेंट विम्याचा 3 मे 2025 रोजी दावा दाखल केला. विमा कंपनीने दावा मंजूर करण्यापूर्वी ब्लू स्पाय यांना चौकशीचे आदेश दिले. या कंपनीच्या अधिकार्‍याला चौकशी करत असताना अनेक गंभीर विसंगती आढळून आल्या व विमा रक्कम मिळवण्याचे प्रकरण हे पूर्णपणे बनावट असल्याचा संशय आहे.

अपघातापूर्वीच झाला होता मृत्यू
संबंधित कंपनीच्या अधिकार्‍यांनी मृत जाधव यांच्या संदर्भात चौकशी केली असता त्यांना दारू पिण्याचे व्यसन असल्याचे तसेच त्यांचा मृत्यू 23 फेब्रुवारी 2024 रोजी यकृताच्या गंभीर आजाराने झाल्याचे समोर आले तसेच विमा चौकशी अधिकारी जेव्हा मृताच्या घरी आले तेव्हा भिंतीवर राजेंद्र शालंदर जाधव यांच्या फोटोवर मृत्यूची दिनांक 23 फेब्रुवारी 2024 असल्याचे नमूद आल्याने त्यांचा संशय खरा ठरला. मुळातच विमा दाव्यानुसार मृत्यूची तारीख 19 एप्रिल 2025 दर्शवण्यात आली त्यानुसार हा प्रकार पूर्णपणे विमा दावा लाटण्यासाठी असल्यावर कंपनीचे एकमत झाले. याहून विशेष मृत्यूची नोंद ग्रामपंचायत मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्ये करण्यात आली नसल्याची पुष्टी कंपनीला 12 फेब्रुवारी 2026 रोजी माहिती अधिकारात झाली तसेच मृतकाच्या विविध कागदपत्रांमध्ये भिन्न पत्ते दिसून आले.

मृताच्या नावावर काढल्या तब्बल दहा पॉलिसी
मृताच्या आधार कार्ड व उद्यममध्ये मालेगाव धुळ्याचे असे वेगवेगळे पत्ते आढळल्याने इन्शुरन्स कंपनीने खोलवर चौकशी केल्यानंतर मृतक राजेंद्र यांच्या नावावर इतर 10 विमा कंपन्यांकडून साधारण व जीवन विमा पॉलिसी घेण्यात आल्याचे व या संदर्भात विविध कंपन्यांकडे दावे केल्याचे स्पष्ट झाले.अपघाताची व मृत्यूची संपूर्ण बनावट कथा तयार करून यामध्ये नोंदी फेरफार व पुराव्यांची बनावट निर्मिती करण्यात आल्याचे विमा कंपनीला स्पष्ट होताच दावा रोखण्यात आला.

एकाचवेळी आठ आरोपींविरोधात गुन्हा : चार पोलिसांचा समावेश
खोटा विमा मंजूर करण्यासाठी सहकार्य करणार्‍या चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर तसेच अपघाताचा खोटा गुन्हा मेहुणबारे पोलिसात दाखल करणारे मेहुणबारे ठाण्यातील पोलिस कर्मचारी महेंद्र पाटील, रवींद्र एकनाथ बत्तीशे, सचिन अशोक निकम, सुनील अशोक निकम तसेच मृताची अरुणा राजेंद्र जाधव, मृताचा भाऊ मिथून जाधव, विमा प्रतिनिधी प्रवीण पाटील, महेंद्र पाटील आदी आठ आरोपींविरोधात मेहुणारे पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम करीत आहे.

रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
बनावट विमा लाटण्याच्या प्रयत्नात चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर यांच्यासारख्या अधिकार्‍याला अटक झाल्याने चाळीसगावाती वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे शिवाय पोलिस दलातील कर्मचारीदेखील सहभागी असल्याने मोठी टोळी वा रॅकेट कार्यरत असल्याचा संशय आहे. आरोपींची सखोल चौकशी करून रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी अपेक्षा आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !