भुसावळात स्त्री शक्तीतून घडला देशभक्तीचा जागर !
प्रतिष्ठा मंडळाच्या नाटीकेतून उलगडले थोर महिलांच्या आयुष्यातील पैलू
Patriotism was awakened through women’s power in Bhusawal! भुसावळ (9 मार्च 2026) : देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण भूमिका वठवणार्या महान विरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई असो की रयतेचे राज्य उभारणार्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी राजमाता जिजाऊंनी केलेले संस्कार असो वा आधूनिक काळात अंतराळात झेप घेणार्या कल्पना चावला असो या थोर महान महिलांचे योगदान आपण आजही विसरू शकत नाही. थोर महिलांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी तसेच नवीन पिढीवर संस्कार रूजण्यासाठी भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाने स्त्री शक्तीच्या माध्यमातून भुसावळात देशभक्तीचा जागर घडवला. या कार्यक्रमाला हजारो भुसावळकरांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त दाद दिली.
भुसावळात घडला देशभक्तीचा जागर
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून भुसावळातील प्रोफेसर कॉलनीतील बियाणी स्कूलमध्ये रविवार, 8 रोजी सायंकाळी देशातील थोर महिलांच्या जीवनावर नाटीकांचे सादरीकरण करण्यात आले. देशाच्या इतिहासात अजरामर झालेल्या या थोर महान विरांगणाच्या कार्याला उपस्थितांनी यावेळी नमन करीत मंडळाच्या उपक्रमाविषयी गौरवोद्गार काढले. मंत्री संजय सावकारे यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
आधूनिक काळातील द्रौपदीने व्हावे सक्षम
महाभारतात द्रौपदीचे चिरहरण होत असताना त्यावेळी श्रीकृष्ण मदतीसाठी धावून आले होते मात्र आधूनिक काळातील द्रौपदीला (अर्थात आजच्या स्त्रीला) स्वतःच सक्षम व्हावे लागेल हे पहिल्या नाटीकेच्या माध्यमातून दर्शवण्यात आले.
कल्पना चावला : …तर तुमच्या स्वप्नांपुढे आकाशही ठेंगणे
अंतराळात प्रवास करणार्या मूळ भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्या जीवन कार्यावर मंडळाच्या सदस्यांनी प्रकाश टाकला. चावला यांचे बालपण ते मृत्यूपर्यंतचा प्रवास नाटीकेतून उलगडण्यात आला. आधूनिक काळातील स्त्रीने सक्षम होण्याचा संदेश यातून देण्यात आला. कल्पना चावला यांची भूमिका रिद्धी माहूरकरने वठवली.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे : माँ जिजाऊ व सावित्रीमाईंचा संवाद
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची प्रेरणा आणि संकल्पना माँ जिजाऊ यांच्याकडूनच घेतली तर महिलांसाठी स्त्री शिक्षणाची कवाडे सावित्रीमाई फुले यांच्यामुळेच उघडली गेली. आपापल्या क्षेत्रात दोन्ही थोर महिलांनी केलेल्या कार्याचा उजाळा प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सदस्यांनी यावेळी नाटीकेतून दिला. स्वातंत्र्यांचा अर्थ स्वैराचार नव्हे हा अनमोल संदेशही यातून देण्यात आला. माँ जिजाऊची भूमिका रजनी सावकारे तर सावित्रीमाईंची भूमिका वर्षा लोखंडे यांनी वठवली. दोन्ही भूमिकांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

जातीची बंधने तोडा तर होईल प्रगती…!
माँ जिजाऊंनी शिवाजी महाराजांना कसे संस्कार दिले? याचे विवेचन नाटीकेतून करण्यात आले. वेद, पुराण, महाभारताचे ज्ञान आपल्या संस्कृतीने दिले मात्र आपण आपली संस्कृतीच विसरत चालल्याचे व आजही आपण जाती-पातीच्या बंधनात अडकल्याने समाजाची प्रगती थांबल्याचा सूचक संदेश नाटीकेतून देण्यात आला. आजकालच्या महिला आभासी जगात (मोबाईल युगात) हरवल्या आहेत. माँ जिजाऊंनी त्याकाळी स्वराज्याचे रक्षणासाठी महिलांच्या हाती तलवार दिली मात्र आजकालच्या महिला आभासी युगात संस्कृती हरवून बसल्या असून आपल्या संस्कृती पुन्हा जोपासण्याची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. महिला-मुलींना सहज उपलब्ध होणारे शिक्षणासाठी अनेक अडचणींवर सावित्रीबाईंना मात करावी लागली, हे देखील नाटीकेतून दर्शवण्यात आले.
झाशीची राणी नाटीकेतून देशभक्तीचा जागर
स्वातंत्र्यासाठी अजरामर झालेल्या झाशीच्या राणी यांच्या जीवनावर मंडळाच्या सदस्यांनी नाटीकेच्या माध्यमातून सादरीकरण केले. लग्नापूर्वीच्या मनकर्णिका यांचा झाशीचे राजे गंगाधरराव नेवाळकरांशी झालेला विवाह व त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अडचणींचा प्रसंग यावेळी उभा करण्यात आला. राज्य खालसा होतानाची स्थिती व या संघर्षातून त्यांनी निर्माण केलेल्या वाटेतून देशभक्तीचा जागर सादर करण्यात आला. झाशीची राणीची भूमिका प्रचिती कुलकर्णी यांनी वठवली. यावेळी राणी चिन्नमा हेमांगी आंबेकर यांच्या जीवनावरही प्रकाश झोत टाकण्यात आला.
स्थानिक कलावंतांसह नगरसेविकांचा सहभाग
विशेष म्हणजे सर्व नाटीकांमध्ये भुसावळच्या उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्यासह सात नवनिर्वाचित नगरसेविकांनी तसेच प्रतिष्ठा मंडळाच्या सदस्यांनी व आपापल्या क्षेत्रात कार्य करणार्या 82 महिला-मुलींनी सहभाग नोंदवत दाद मिळवली. कला क्षेत्रातील कुठलाही वारसा व अनुभव नसताना महिलांनी आपल्यातील कला गुण सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळवली. दरम्यान, या कार्यक्रमात पहिलीची विद्यार्थिनी हिमांशी पाटीलने छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्यावर व्यक्त केलेल्या मनोगताला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
भुसावळकरांचा गौरव वाढवणार्या स्त्री शक्तीचा सन्मान
या कार्यक्रमात फौजदारपदी नियुक्त झालेल्या उर्मिला पाटील तसेच नासा संस्थेत निवड झालेल्या भुसावळातील खुशबू ठाकूर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

सखींना आकर्षक बक्षिसे : रक्तदान शिबिराचे आयोजन
कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणजे लकी ड्रा च्या माध्यमातून सहा सखींना सहा पैठण्या तसेच दोन चांदीचे नाणे, 25 आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमस्थळी रोटरी क्लब व गोदावरी हॉस्पीटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यांची प्रमुख उपस्थिती
महामंडलेश्वर जनार्दन महाराज, मंत्री संजय सावकारे, डीवायएसपी केदार बारबोले, उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, उद्योजक मनोज बियाणी, डॉ.संगीता बियाणी, जि.प.च्या मुख्याधिकारी मीनल करनवाल, मुकेश खपली आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, जयश्री चौधरी, राजश्री बादशाह, वैशाली भगत, वर्षा लोखंडे, नगरसेविका सोनल महाजन, श्यामल झांबरे, रोहिणी पाटील, सारीका भारंबे व मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी करीत आभारही मानले.
भुसावळ कलावंतांची खाण : मंत्री संजय सावकारे
मंत्री संजय सावकारे म्हणाले की, भुसावळ ही कलावंतांची खाण आहे. प्रतिष्ठा महिला मंडळार्फे दरवर्षी उत्कृष्ट कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते. या कार्यक्रमातून स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठही उपलब्ध होत आहे. स्त्री शक्तीच्या कार्याचे करावे तेव्हढे कौतुक थोडेच आहे.
मातृशक्तीने केलेला कार्यक्रम कौतुकास्पद : महामंडलेश्वर
महामंडलेश्वर जनार्दन महाराज म्हणाले की, सध्या एखाद्याच्या सदगुणांचे कौतुक करणे कठीण आहे, आपल्या दुःखाने आपण जेव्हढे आपण दुखी नाहीत तेव्हढे आपण इतरांच्या सुखी असण्याने आहोत. भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाने सादर केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. दरवर्षीय महिला मंडळातर्फे दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते. स्त्री हत्या, वृक्षांची कत्तल व गो हत्या थांबणे गरजेचे असून प्रत्येक घरी एकतरी मुलगी असावी, असेही महामंडलेश्वर म्हणाले.
भारताच्या विजयाचा जल्लोष
कार्यक्रमादरम्यान मधून-मधून भारत-न्यूजीलंडदरम्यानच्या सामन्याचे प्रक्षेपणही करण्यात येत होते तर भारताने टी 20 सामना जिंकल्यानंतर यावेळी महिलावर्गाने मोठा जल्लोष केला.







