पिंप्रीहाटला ‘मागासवर्गीय’ कुटुंबावर झालेल्या भ्याड व अमानुष हल्ल्याचा निषेध : दोषींवर मोक्कान्वये कारवाईची मागणी
जळगाव (9 मार्च 2026) : भडगाव तालुक्यातील पिंप्रीहाट येथे 4 मार्च 2026 रोजी घडलेली घटना ही केवळ मारहाण नसून ती मागासवर्गीय समाजाच्या अस्तित्वावर आणि अस्मितेवर झालेला सुनियोजित हल्ला आहे. तक्रारदार व त्यांच्या कुटुंबावर ज्या पद्धतीने घरात घुसून, महिलांचा विनयभंग करत प्राणघातक हल्ला करण्यात आला, तो प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारा असून या घटनेतील आरोपींवर मोक्कान्वये कारवाईची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे रिपब्लिकन सेनेतर्फे करण्यात आली.
दोषींवर हवी कठोर कारवाई
संशयीत ज्ञानेश्वर धनराज पाटील, बापू शिवाजी पाटील, दिनेश शिवाजी पाटील, भूषण गुलाबराव पाटील व त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या महिला साथीदारांनी मागासवर्गीय समाजाला संपवून टाकण्याची भाषा वापरून जो दहशतवाद माजवला आहे, तो रिपब्लिकन सेना मुळीच सहन करणार नाही. या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि समाजात निर्माण केलेली दहशत पाहता, त्यांच्यावर केवळ सामान्य कलमे लावणे अपुरे आहे. आरोपींनी संघटितपणे हा गुन्हा केला असून परिसरात त्यांची मोठी दहशत असल्याने त्यांच्याविरोधात मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, सर्व आरोपींना येत्या 72 तासांत बेड्या ठोकाव्यात , आरोपींना कोणत्या राजकीय नेत्याचे संरक्षण मिळत आहे, याचा शोध घेवून सत्तेच्या मस्तीत मागासवर्गीयांच्या रक्ताने हात माखणार्या एकाही गुंडाला सोडले जाऊ नये, या प्रकरणाचा तपास आयपीएस दर्जाच्या अधिकार्यामार्फत करून, विशेष सरकारी वकिल नियुक्त करावेत आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, पीडीत कुटूंबाला तत्काळ सशस्त्र पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे, आरोपींनी पीडितांचा मोबाईल हिसकावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे आणि मोबाईल तत्काळ हस्तगत करून आरोपींच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करावेत आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. 72 तासांत आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली नाही, तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने संपूर्ण जळगाव जिल्हा बंद पाळण्यात येईल. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना रिपब्लिकन सेना, जळगाव जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, रिपब्लिकन कामगार सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष देवदत्त मकासरे मेजर, भडगाव तालुकाध्यक्ष वाल्मीक लोखंडे, पाचोरा तालुकाध्यक्ष विशाल बागुल, पाचोरा तालुका महासचिव दीपक राजपूत, जिल्हा सदस्य बंटी नरवाडे, मांगो पगारे, सिध्दार्थ पगारे, सुपडाबाई कदम आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री व गृह विभागाच्या वरिष्ठांना निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे.







