अकलूद शिवारात आजपासून महाशिवपुराण कथा : गर्दीमुळे वाहतूक वळवली


Mahashivpuran story भुसावळ (10 मार्च 2026) : भुसावळजवळील पाडळसे (ता.यावल) येथील अकलूद शिवारात मंगळवार, 10 मार्चपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शहरातील तापी नगर, तापी नदी ते कथास्थळापर्यंत कलश शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान, कथेला होणारी गर्दी पाहता भुसावळमार्गे रावेरहून मध्य प्रदेश आणि भुसावळकडून यावल मार्गे गुजरातकडे जाणारी व येणारी सर्व अवजड वाहतूक सलग सात दिवस सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

आयोजकांतर्फे भाविकांसाठी सुविधा
आयोजन समितीने भाविकांना सुविधा देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. कथास्थळी 132 बाय 600 चा एक तर 100 बाय 600 फूट आकाराचे तीन जर्मन हँगर डोम उभारले आहे. मुख्य व्यासपीठ 40 बाय 80 फुटांचे आहे. सोबतच भाविकांच्या आसन व्यवस्थेसाठी 1500 सिलिंग मंडप तर भोजन व्यवस्थेसाठी 380 सिलिंग मंडप टाकले आहेत. येथे दररोज किमान एक लाख भाविक प्रसाद घेवू शकतील, अशी व्यवस्था आहे. मंडपात प्रखर प्रकाश देणारे दिवे बसवले आहेत. सोमवारी दुपारपासून भाविकांची गर्दी वाढली. सायंकाळपर्यंत सहा हजारांपेक्षा जास्त भाविक दाखल झाल्याने कथा स्थळाला यात्रेचे स्वरुप आले.



या मार्गावरील वाहतूक बंद
कथेआधी व संपल्यानंतर भुसावळ ते फैजपूर व यावल हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल. यामुळे तापी नदी वाय पॉइंटवर तात्पुरते बॅरिकेडिंग करण्यात आले. मात्र, रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत वाहतूक सुरळीत राहील. कथा सुरु झाल्यावर रस्त्यावर गर्दी कमी असेल तर स्थिती पाहून वाहने सोडली जातील.

पं.प्रदीप मिश्रा यांचे रात्री 9 वाजता आगमन
कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा हे ललितपूर झांसी येथून रस्ते मार्गाने येणार होते मात्र ते रविवारी हेलिकॉप्टरने येणार असल्याची माहिती मिळाली. यानंतर आयोजक व प्रशासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर तात्पुरते हेलिपॅड उभारण्यात आले. दुपारी दोन वाजेपर्यंत ते येणार असल्याने भाविकांनी 12 वाजेपासूनच मैदानावर गर्दी केली. मात्र, दुपारी चार वाजता हा दौरा रद्द होऊन पुन्हा रस्ते मार्गाचे नियोजन झाले. रात्री 9 वाजता ते भुसावळात दाखल झाले.

यावल रोडवरील लोटगाड्या हटवल्या मात्र टपर्‍या ‘जैसे थे’
यावल रस्त्यावरील भाविकांची गर्दी लक्षात घेता पालिकेने अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीसा बजावल्या मात्र प्रत्यक्षात हातावर पोट भरणार्‍या लोटगाडी व्यावसायीकांना हटवले मात्र फुले, माठ विक्रेते, फर्निचर विके्रते अद्यापही यावल रस्त्यावर ठाण मांडून असून अनेक अतिक्रमित टपर्‍या जैसे थे असल्याने पालिकेच्या या दुटप्पी भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या संदर्भात दखल घ्यावी, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !