महिलांनी चालवले साकळी ग्रामपंचायतीचे कामकाज
महिला कर्मचार्यांचा केला सत्कार : उपस्थित महिला- भगिनी भारावल्या
यावल (11 मार्च 2026) : यावल तालुक्यातील साकळी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महिला सन्मानार्थ व नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून दि.9 मार्च 2026 रोजी साकळी ग्रामपंचायतीचा एक दिवसाचा कारभार महिलांपदाधिकार्यांनी यशस्वीपणे सांभाळला.सदर उपक्रमाची संकल्पना साकळीचे लोकनियुक्त सरपंच दिपक नागो पाटील यांची होती. सदर उपक्रम अनुभवतांना उपस्थित महिला- भगिनी भारावून गेल्या व या अभिनव उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.
या महिला दिनाच्या सुरुवातीला रचना दीपक पाटील यांनी सरपंचपदाचा तसेच पुरुष ग्रा.पं.सदस्यांच्या सुविद्य पत्न्यांनी ग्रामपंचायत सदस्यपदाचा पदभार हाती घेतला.असे एकूण 18 महिला पदाधिकार्यांनी ग्रामपंचायत कारभाराची जबाबदारी घेतली होती.या सर्व पदाधिकार्यांनी एक बैठक घेऊन व कर्मचार्यांना मदतीने ग्रामपंचायतीच्या दिवसभराच्या कामकाजाचे नियोजन केले. त्यानंतर विशेष अशा महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते.यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सरपंच सौ.रचना दिपक पाटील, उपसरपंच नूरबी तस्लिम खान तसेच उपस्थित सर्व महिलापदाधिकारी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.त्यानंतर गावातील आरोग्य क्षेत्रात सदैव कार्यरत असणार्या सर्वआशा वर्कर भगिनी तसेच महिला व बालविकास क्षेत्रात आपले यशस्वीपणे कर्तुत्व सिद्ध करणार्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदभार घेतलेल्या सरपंच सौ.रचना दिपक पाटील होत्या.या कार्यक्रमादरम्यान माजी ग्रा.पं.सदस्या सौ.पुष्पाताई पाटील,सौ.रोहीणी नेवे, सौ.अर्चना नेवे यांचेसह काही महिलांनी मनोगत व्यक्त केले.मनोगतातून त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडून आयोजित केलेल्या या अभिनव अशा महिला दिनाचे कौतुक केले.यावेळी डिजिटल व्यवहार करताना कोणती खबजदारी घेतली पाहिजे. यावर एक विशेष चर्चासत्र आयोजित केलेले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका सौ मंगला सुधाकर नेवे यांनी केले.यानंतर सरपंच सौ. रचना पाटील व महिला पदाधिकारी तसेच उपस्थित महिला- भगिनींनी ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो याची कर्मचार्यांकडून माहिती जाणून घेतली.तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे रंगरंगोटी, फर्निचर, सुखसुविधा या मुळे पालटलेले रूप पाहून आनंद व्यक्त केला.-पु



