मार्च एण्ड : वीज कंपनीकडून दहा लाखांची थकबाकी वसुल
यावलमध्ये जुने मीटर बदलून नवीन डिजिटल पोस्टपेड मीटर बसवण्याला सुरुवात
March End: Recovery of dues of Rs 10 lakh from electricity company यावल (13 मार्च 2026) : वीज कंपनीने थकबाकीदारांविरोधात धडक मोहिम राबवण्यास सुरवात केली असून आतापर्यंत शहर व तालुक्यातील 388 ग्राहकांकडून नऊ लाख 55 हजार 740 रुपंयाची थकबाकी वसुल करण्यात आली. दरम्यान, जुने मीटर बदलून त्या ठिकाणी नवीन डिजिटल पोस्टपेड मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या मोहिमेत 50 हून अधिक जणांचे वीज मीटर बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले.
थकबाकीदारांच्या गोटात खळबळ
मार्च अखेरमुळे यावल शहर व तालुक्यात वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सुहास चौधरी, सहायक अभियंता विनायक बोतरकर, सहाय्यक अभियंता विशाल किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक वसुली मोहीम सुरू करण्यात आली. यावल शहरात कंपनीचे कर्मचारी प्रवीण पाटील, गणेश खर्चे, धीरज चौधरी, विशाल कोळी, संतोष महाजन, विष्णू कोळी, कुर्बान तडवी यांच्या पथकाने थकबाकी वसुलीवर भर दिला. बुधवार व गुरुवार या दोन दिवसांत 388 ग्राहकांकडून 9 लाख 55 हजार 740 रुपयांची वसुली केली. जे थकबाकीदार वीज बिलाचा भरणा करणार नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला. तसेच शहरात जे काही जुने मीटर होते ते बदलून त्या ठिकाणी नवीन डिजिटल पोस्टपेड मीटर लावण्याचे काम देखील हाती घेतले.




सकाळी 10 ते 5 वेळेत प्रति युनिट 80 पैशांची सूट वितरण कंपनीकडून अचूक रीडिंग देणारे पोस्टपेड मीटर बसवण्यात येत आहे. या मीटरच्या माध्यमातून आपले किती युनिट खर्च झाले, बिल किती झाले आहे? हे पारदर्शकपणे दिसते. शासनाने दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत वापर होणार्या प्रति युनिटसाठी 80 पैशांची सूट देखील ग्राहकांना दिली आहे. ही सूट पोस्टपेड मीटर धारकांनाच आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
शहरातील व्यावसायीक वीज कनेक्शन धारक आहेत. या ग्राहकांना पोस्टपेड मीटर देण्यात आले आहेत. या मीटरच्या माध्यमातून थकबाकीदारांची संख्या नगण्य आहे. कारण या मीटरधारक ग्राहकांनी 45 दिवसात बिल न भरल्यास ऑनलाइन पद्धतीने वीजपुरवठा खंडित होतो. बिल भरल्यावर तो काही मिनिटांनी सुरू होतो. परिणामी कर्मचार्यांची दगदग टळते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
9.55 लाख रुपये वसूल : शहर व तालुक्यात दोन दिवसांच्या मोहिमेमध्ये ग्रामीण भागातून 203 ग्राहकांकडून तीन लाख एक हजार 440, तर यावल शहरातील 185 ग्राहकांकडून सहा लाख 54 हजार 300 अशी नऊ लाख 55 हजार 740 रुपयांची वसुली करण्यात आली.