भुसावळात क्रिकेटच्या वादातून पिता-पूत्रावर बॅटने हल्ला
Father and Son Attacked with Bat Over Cricket Dispute in Bhusawal भुसावळ (18 मार्च 2026) : शहरातील वांजोळा रोड परिसरात क्रिकेट खेळण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाने भीषण रूप धारण करत थेट हाणामारीपर्यंत मजल मारली. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांनी मिळून पिता-पूत्रावर क्रिकेटच्या बॅटने व हातातील कड्याने हल्ला केला. ही घटना 14 मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लक्ष्मी नगर परिसरात घडली. याप्रकरणी सोमवार, 16 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ रवींद्र बारी (40) हे आपल्या कुटुंबियांसह लक्ष्मी नगर, वांजोळा रोड येथे वास्तव्यास असून त्यांच्या मुलगा ध्रुव आणि आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता. याच जुन्या वादाचा राग मनात ठेवून आरोपींनी बारी यांच्या घरासमोर येत गोंधळ घातला. आरोपी उमेश विकास धनगर, ओम विकास धनगर आणि रंजना विकास धनगर यांनी संगनमत करून गोपाळ बारी, त्यांचा मुलगा ध्रुव तसेच वडील रवींद्र बारी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी त्यांनी क्रिकेटची बॅट व हातातील कड्याचा वापर करून बेदम मारहाण केल्याने तिघेही जखमी झाले. याचवेळी तुमच्या मुलाला मारून टाकू अशी धमकी देत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


तिघांविरोधात गुन्हा दाखल
गोपाळ बारी यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.