जळगावातील सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता ताठे यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार
जळगाव (18 मार्च 2026) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा सन 2023-24 व 2024-25 या वर्षाचा ’ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ वितरण सोहळा मंगळवार, 17 मार्च 2017 रोजी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ चर्चगेट, मुंबई येथे पाटकर दीक्षांत सभागृहात झाला. या सोहळ्यात स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि महिला सबलीकरण क्षेत्रात निरलस कार्य करणार्या महिलांचा गौरव करण्यात आला. जळगावातील सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता ताठे यांनादेखील या सोहळ्यात गौरवण्यात आले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी मंत्री चंद्रकांत पाटील होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव यांची प्रमुख उपस्थिती होती.


11 महिलांचा सन्मान
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सेवावृत्तीचा वारसा पुढे नेणार्या महाराष्ट्राच्या सहा महसुली विभागातील निवडक 11 महिलांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन 2023-24 व सन 2024-25 या वर्षीचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या गौरव सोहळ्यास विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उच्च शैक्षणिक संस्थांचे संचालक, अध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, राज्य शासनाचे विविध विभागातील अधिकारी/कर्मचारी, विद्यापीठाचे अधिकारी कर्मचारी आणि एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, व इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक उच्च शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळानकर यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व आयोजन सहसंचालक डॉ.अर्चना बोर्हाडे यांनी एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठाच्या सहकार्याने व डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांच्या मार्गदर्शनाने केले.