जळगाव जिल्ह्यात केळी पीक विमा घोटाळा : रावेरसह मुक्ताईनगरातील नऊ सीएससी केंद्र चालकांवर गुन्हा
Banana Crop Insurance Scam in Jalgaon District : Cases Filed Against Nine CSC Center Operators in Raver and Muktainagar भुसावळ (19 मार्च 2026) : जळगाव जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा केळी पीक विमा योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील नऊ सीएससी केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ?
मुक्ताईनगर तालुक्यात केळी पीक विम्याच्या नावाखाली सुमारे 66 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा बोगस व्यवहार केल्याप्रकरणी 5 सीएससी केंद्रचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले तर रावेर तालुक्यात सुमारे चार कोटी 74 लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चार केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या दोन्ही कारवायांमुळे जिल्ह्यातील विमा प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


तपासात उघड झाल्यानुसार, अनेक ठिकाणी प्रत्यक्षात केळी पीक नसतानाही विमा अर्ज भरून पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आलेल्या पडताळणीत शेकडो हेक्टर क्षेत्रावर पीक नसल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणात सीएससी केंद्रचालकांनी संगनमताने बनावट कागदपत्रे वापरून, चुकीची माहिती पोर्टलवर अपलोड करून शासन आणि विमा कंपनीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. या प्रकारात शेतकर्यांच्या नावावर बोगस अर्ज दाखल करून अनुदान लाटण्याचा डाव रचण्यात आला होता.
प्रशासनाने या प्रकरणी कठोर भूमिका घेतली असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच जिल्ह्यातील इतर संशयित केंद्रांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कृषी विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, विमा अर्ज प्रक्रियेत कोणतीही फसवणूक आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. शेतकर्यांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणार्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
दरम्यान, या घोटाळ्याच्या तपासातून आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.