अमळनेरात व्यापार्याची लाखोंची लूट : धुळ्यातील कुख्यात आरोपीला बेड्या
Merchant Robbed of Lakhs in Amalner : Notorious Accused from Dhule Arrested जळगाव (19 मार्च 2026) : भरदिवसा अमळनेरातील व्यापार्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लाखोंची रोकड लुटणार्या आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करीत धुळे जिल्ह्यातील एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे तर आरोपीच्या दोन साथीदारांचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. मनोज ऊर्फ खुशाल अशोक मोकळ (26) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे प्रकरण ?
15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 10.55 वाजता अमळनेर येथील लामा जिनिंगचे मालक यतीन विनोद कोठारी (48) हे त्यांच्या अॅक्टिवा दुचाकीवरून (एम.एच.19 बी.सी.1465) हे पाच लाख 27 हजार 200 रुपयांची रोख रक्कम घेऊन जात असताना पिंपळे रोडवर तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्यांच्याकडील रोख रकमेची बॅग जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपासादरम्यान हा गुन्हा धुळे येथील मनोज ऊर्फ खुशाल अशोक मोकळ (26) याने आपल्या साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झालल्यानंतर पथकाने सापळा रचून आरोपीला शिताफीने अटक केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली व सुमारे दीड लाख रुपये काढून दिले. उर्वरित रकमेचा आणि पसार साथीदारांचा शोध सुरू आहे. आरोपी मनोज मोकळ हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याने जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून 15 लाखांची लूट केली आहे.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, संदीप पाटील, हरिलाल पाटील, प्रवीण मांडोळे, राहुल कोळी, दीपक चौधरी यांनी केली. तांत्रिक विश्लेषण कामी गौरव पाटील व मिलिंद सिताराम जाधव यांनी सहकार्य केले. तपास अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.