केळी पीक विम्यात फसवणूक : यावल तालुक्यातील पाच सीएससी केंद्र चालकांविरोधात गुन्हा


Fraud in Banana Crop Insurance : Case Registered Against Five CSC Center Operators in Yawal Taluka यावल (19 मार्च 2026) : केळी पीक विमा योजनेत रावेरसह मुक्ताईनगर तालुक्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्यानंतर तेथील नऊ सीएससी केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर गुन्ह्याची व्याप्ती यावल तालुक्यातही असल्याने येथील पाच केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली.

पोलिसांकडून तपासाला वेग
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तब्बल 16 कोटी 63 लाख 48 हजार 85 रुपयांची अफरातफर झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाला वेग आला आहे. फिर्यादी भरत वामन वारे (52) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यावल तालुक्यातील साकळी, निमगाव, मनवेल, भालोद, मोहाळे आणि यावल येथील विविध सीएससी केंद्र चालकांनी संगनमताने हा गैरप्रकार केला आहे.



पीक नसताना रचला कट
खरीप हंगाम 2025-26 साठी पीक विमा नोंदणी करताना संबंधित केंद्र चालकांनी शेतकर्‍यांकडून 7/12 उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुकसारखी महत्त्वाची कागदपत्रे घेतली मात्र प्रत्यक्षात पीक नसलेल्या क्षेत्राचे खोटे दाखले तयार करून विमा रक्कम मिळवण्याचा मोठा कट रचण्यात आला.

या घोटाळ्यात सुमारे दोन हजार 41 शेतकरी प्रभावित झाले असून 2284.9 हेक्टर क्षेत्र दाखवले असताना प्रत्यक्षात 2437.39 हेक्टर क्षेत्र दाखवून 1089.28 हेक्टर अतिरिक्त क्षेत्राची बनावट नोंद करण्यात आली. या खोट्या माहितीच्या आधारे शासनाची दिशाभूल करून कोट्यवधींचा अपहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात संबंधित सीएससी केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये साकळी, निमगाव, मनवेल, भालोद, मोहाळे आणि यावल येथील केंद्र संचालकांचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निदर्शनास ही बाब येताच तात्काळ कारवाई करण्यात आली.

सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !