स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरातचा नवा कारनामा उघड : गर्भवती महिलेवरही अत्याचार !
Self-Proclaimed Numerologist Ashok Kharat’s Latest Atrocity Exposed: Assaults Even a Pregnant Woman! नाशिक (22 मार्च 2026) : स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरातचा नवीन कारनामा समोर आला आहे. पीडित महिला गरोदर असताना तिच्यावर ‘पूजा विधी’च्या नावाखाली अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. आधीच अनेक महिलांच्या शोषणाप्रकरणी कोठडीत असलेल्या खरातविरुद्ध आता नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात आणखी एक अत्यंत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.
गर्भवती महिलेवरही अत्याचार
पीडित महिला गर्भवती असताना अशोक खरातने तिला विधी करण्याच्या बहाण्याने बोलावले होते. यावेळी महिलेसोबत आलेल्या तिच्या पतीला कार्यालयाबाहेर बसवून त्याने आतमध्ये ‘उपचार’ आणि ‘धार्मिक विधी’चे नाटक करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या कृत्याबद्दल कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने पीडितेला दिली. या नवीन तक्रारीमुळे अशोक खरातचा पाय आता आणखी खोलात गेला.

नकली साप अन् वाघाच्या कातड्याचा धाक
विशेष तपास पथकाच्या तपासात खरातच्या कार्यालयातून धक्कादायक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. भाविकांमध्ये आपली ‘दैवी शक्ती’ सिद्ध करण्यासाठी आणि त्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी अशोक खरात नकली साप आणि वाघाच्या कातड्याचा वापर करत असे. या अघोरी साहित्याद्वारे तो विधी करत असल्याचे भासवत असे. या कृत्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी आता खरातवर ‘महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्या’सह भारतीय न्याय संहितेच्या (इछड) कलम 64(1), 74 आणि 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता
अशोक खरातचे पाप उघड झाल्यानंतर आता आणखी तीन महिलांनी धैर्याने पुढे येत तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे. ’एसआयटी’ने या महिलांचे जबाब अत्यंत गोपनीय पद्धतीने नोंदवण्यास सुरुवात केली आहे. या महिलांच्या साक्षीमुळे खरातविरोधातील कायदेशीर बाजू अधिक भक्कम होणार आहे. यापूर्वीच खरातच्या डिजिटल उपकरणांमधून 100 हून अधिक संशयास्पद व्हिडिओ मिळाल्याने खळबळ उडालेली असताना, आता प्रत्यक्ष समोर येणार्या पीडितांच्या संख्येमुळे तपास यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.
