जळगाव खुनाने हादरले : केस मागे न घेतल्याच्या वादातून तरुणाला संपवले
Jalgaon Rocked by Murder : Youth Killed in Dispute Over Refusal to Withdraw Case जळगाव (23 मार्च 2026) : वर्षभरापूर्वी दाखल केलेले केस मागे न घेतल्याच्या वादातून जळगावात तरुणाची धारदार चॉपरने हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना शहरातील जैनाबाद परिसरात रविवार, 22 मार्च रोजी दुपारी तीन वाजता घडली. नितीन नाना काळे (35, रा.जैनाबाद, जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून संशयीत शाम तुकाराम सूर्यवंशी (दिनकर नगर, जळगाव) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुनी केस मागे घेण्याच्या वादातून घटना
नितीन हा तरुण आई-वडील, पत्नी, मुलगा, भाऊ-बहीण यांच्यासह शहरात राहत होता. काही महिन्यांपूर्वी गोवा येथे कटलरीच्या दुकानात नोकरी मिळाल्याने तो तेथे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गेल्या चार दिवसांपासून सुट्टीच्या कारणाने व कोर्टाच्या कामानिमित्ताने जळगावी आला मात्र रविवारी दुपारी जैनाबाद परिसरात तो जात असताना त्याला संशयित आरोपी शाम तुकाराम सूर्यवंशी याने वर्षभरापूर्वी केलेली केस मागे घ्यावी म्हणून वाद घातला व या वादातून चॉपर नितीनला लागल्याने त्याचे पोटाचे आतडे बाहेर येवून तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी नितीन काळे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना सोमवार, 23 मार्च रोजी सकाळी सहा वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

यावेळी कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. दरम्यान किरकोळ कारणाने झालेल्या खुनामुळे जळगाव पुन्हा एकदा हादरले आहे.
