चोपडा तालुका हादरला : घरगुती वादातून लहान भावाला संपवले
Chopda Taluka Shaken : Younger Brother Killed Over Domestic Dispute चोपडा (23 मार्च 2026) : घरगुती वादातून मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची संतापजनक घटना चोपडा तालुक्यातील नारोद येथे घडली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रोहन पानचंद पाटील (27) असे खून झालेल्या युवकाचे तर किरण पानचंद पाटील असे अटकेतील आरोपी भावाचे नाव आहे.
काय घडले चोपडा तालुक्यात ?
शनिवार, 21 मार्च रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास नारोद येथील गुळी नदीच्या पात्रात रोहनचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. गळ्याला आणि पायाला गंभीर जखमा होत्या. आरोपी किरणने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मयत रोहन हा सतत नशा करून आई-वडील आणि भावाला शिवीगाळ करायचा. घरात रोज होणार्या वादामुळे आणि त्रासामुळे सर्व कुटुंबीय कंटाळले होते.

रात्री किरणने शुक्रवार, 20 मार्च रोजी रोहनला दारू पिण्यासाठी पाच हजार रुपये दिले. त्यानंतर संधी साधून गुळी नदीच्या पुलावरून त्याला खाली ढकलले. रोहन जखमी अवस्थेत असताना किरणने त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे आणि त्यांच्या टीमने किरणच्या हालचालींवर संशय आल्याने त्याची चौकशी केली.
किरणच्या चेहर्यावर ओरखडे आणि जखमा दिसून आल्याने पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. या कारवाईत अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, चोपडा डीवायएसपी अण्णासाहेब घोलप आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
