भोंदू बाबा अशोक खरातचे शंभर नव्हे तर दोनशे व्हिडिओ : विजय वडेट्टीवारांचा दावा

90 व्हिडिओ आक्षेपार्ह : स्थगन प्रस्ताव आणण्याची ग्वाही


Not One Hundred, But Two Hundred Videos of Fraudulent Guru Ashok Kharat: Vijay Wadettiwar Claims मुंबई (23 मार्च 2026) : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे 100 नव्हे तर 200 व्हिडिओ असून त्यातील 90 व्हिडिओ अत्यंत आक्षेपार्ह आहेत, असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे तर या प्रकरणावरून विधिमंडळात स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण केले आहे. या प्रकरणात आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.


सत्ताधारी भाजपावर सडकून टिका
माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, ज्यांच्या हातात जनतेने विकासाची दोरी दिली, ते आज भोंदूबाबासोबत ज्योतिषाची दोरी ओढत आहेत. अशा प्रकारची भोंदूगिरी जोपासण्यासाठी केवळ भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. या 200 व्हिडिओंमध्ये अनेक मंत्री आणि आयएएस दर्जाचे अधिकारी अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. केवळ महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊन भागणार नाही, तर या सर्व दोषींची तातडीने गच्छंती झाली पाहिजे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

महिला असल्यानेच चाकणकरांना टार्गेट केले का?
नाना पटोले यांनी या प्रकरणात लैंगिक भेदभावाचा मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरले. रूपाली चाकणकर महिला असल्याने त्यांना टार्गेट केले जात आहे का? ज्या मंत्र्यांचे फोटो आणि संबंध समोर आले आहेत, त्यांचे राजीनामे सरकार कधी घेणार? असा सवाल पटोले यांनी विचारला. मंत्रालयातील बड्या अधिकार्‍यांचाही यात समावेश असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला.

तो पेनड्राईव्ह मुख्यमंत्र्यांनी का लपवला?
नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मागच्या अधिवेशनात मी नाशिकच्या एका मुद्यावर विधानसभेत एक पेनड्राईव्ह दिला होता मात्र मुख्यमंत्र्यांनी तो का लपवून ठेवला? जर तेव्हाच कारवाई झाली असती तर आज महाराष्ट्र इतका बदनाम झाला नसता. अशोक खरात प्रकरणात कोणत्याही मागणीशिवाय सरकारने तातडीने एसआयटी का स्थापन केली? हे प्रकरण दाबण्यासाठी तर हा प्रयत्न नाही ना? अशी शंका नाना पटोले यांनी व्यक्त केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !