यावलच्या तरुणाचा धावत्या दुचाकीवर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


Youth from Yawal dies of heart attack while riding a two-wheeler यावल (23 मार्च 2026) : यावल शहरातून मार्गस्थ होणार्‍या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर चोपडा नाक्याजवळ 32 वर्षीय तरुण हा दुचाकीद्वारे शहरात येत असताना दुचाकीवरचं त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. तत्पूर्वी या भागातील मुस्लिम तरुणांनी तातडीने या तरुणाला तिथून उचलून यावल ग्रामीण दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. ही घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. महेश संतोष येवले (32, रा.शिवाजीनगर, यावल) असे मृत तरुणाचे नाव आहे.

काय घडले नेमके ?
महेश हा तरुण शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी होता. शहरातून मार्गस्थ होणार्‍या अंकलेश्वर – बर्‍हाणपूर राज्य मार्गावर चोपडा नाक्याजवळ कोरपावली शेत शिवारातून शेतातून काम करून महेश संतोष येवले हा त्याच्या दुचाकीद्वारे शहरात येत असताना चोपडा नाक्याचा जवळ अचानक धावत्या दुचाकीवर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तो दुचाकीवरून रस्त्यावर कोसळला. हा प्रकार बाबा नगर परिसरातील रहिवासीी मुस्लिम तरुणांच्या निदर्शनास आला. त्यांनी तेथे धाव घेतली आणि रस्त्यावर कोसळलेल्या या तरुणाला तेथून तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे यांनी तरूणास तपासणी करून त्याला मयत घोषित केले.


नगराध्यक्षांनी घेतली धाव
घटनेची माहिती मिळताच यावलच्या नगराध्यक्ष छाया पाटील, नगरसेवक अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, रोशन येवले, बापू जासूदसह आदींनी रुग्णालयात धाव घेत मयत तरुणांच्या कुटुंबांचे सात्वन केले. दरम्यान, या घटनेमुळे शहरातून हळहळ व्यक्त होत आहे. मयत तरुणाच्या पश्चात आई, भाऊ, आजी असा परिवार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !