धुळे, परभणीसह राज्यातील टपाल कार्यालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी !
Threat to blow up post offices across the state, including those in Dhule and Parbhani. धुळे/परभणी (25 मार्च 2026) : धुळ्यासह परभणी व अन्य राज्यातील पासपोर्ट व टपाल कार्यालयांना आरडीएक्स बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल बुधवारी दुपारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. विशेषतः या मेलमध्ये बुधवारी दुपारी 12.10 वाजता सायनाईड मिश्रित 16 आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार असल्याचा गंभीर इशारा देण्यात आल्यानंतर कर्मचार्यांची भंबेरी उडाली. सुरक्षा यंत्रणांनी धाव घेत तपासणी केल्यानंतर धमकीत कुठलेही तथ्य न आढळल्याने कर्मचार्यांनी काही वेळेनंतर सुटकेचा श्वास घेतला.
राज्यभरात आला धमकीचा ई मेल
या पार्श्वभूमीवर परभणीसह राज्यातील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये तत्काळ सतर्कता बाळगण्यात आली. अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालय परिसराची पाहणी करण्यात आली तर काही ठिकाणी नागरिकांना बाहेर जाण्याचा सल्ला देण्यात आला. कर्मचार्यांना दक्ष राहण्याचे निर्देश देत प्रशासनाने कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेतली. परभणी प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेत वरिष्ठ अधिकार्यांना माहिती दिली व संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले. संबंधित वेळ उलटल्यानंतर कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा स्फोटाची घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाल्याने अधिकारी व कर्मचार्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

तामिळनाडूतून मेल पाठविल्याचा अंदाज
संबंधित ई-मेलची प्राथमिक तपासणी केली असता तो तामिळनाडू येथून पाठविण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.




