खंडाळेत वीज वितरणच्या महिला कर्मचार्याला धक्काबुक्की : दोषींवर कारवाईसाठी कर्मचारी संतप्त
Female Electricity Distribution Employee Manhandled in Khandala: Staff Outraged, Demand Action Against Culprits भुसावळ (26 मार्च 2026) : मार्च एण्डच्या वसुलीसाठी भुसावळ तालुक्यातील खंडाळे गावात गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या महिला कर्मचारी ज्योती शिंपी यांना काही स्थानिकांनी धक्काबुक्की करीत शिविगाळ केल्याने वीज कर्मचारी संतप्त झाले. कर्मचार्यांनी एकत्र येत या घटनेचा निषेध करीत दोषींवर कारवाईची मागणी केली.
तर कामावर न जाण्याचा इशारा
या घटनेच्या पार्श्वभूमीवर विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र येत या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. महिला कर्मचार्यांच्या सन्मानावर व सुरक्षिततेवर आघात करणारे असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता महाजन, आखरे, तडवी तसेच संघटनेचे प्रतिनिधी व कर्मचारी रवी गायकवाड, किशोर सपकाळे, भुषण पाटील, किरण कापसे, मुकेश कोल्हे, समाधान बुगले, राहुल पाटील, सोनिया साळुंखे, पूजा वणवे आदींसह ग्रामीण व शहर वीज वितरण विभागातील अनेक कर्मचारी उपस्थित होते.

संघटना कर्मचार्यांच्या पाठीशी
संघटनेने स्पष्टपणे जाहीर केले की, अशा कोणत्याही प्रकाराविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाईल आणि सर्व कर्मचार्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलली जातील तसेच सर्व कर्मचार्यांना आवाहन करण्यात आले की, अशा प्रसंगी एकमेकांना सहकार्य करावे व कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ वरिष्ठ अधिकारी व संघटनेला माहिती द्यावी. संघटना आपल्या सर्व कर्मचार्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.




