अवकाळी पावसाची चाहुल : राज्यात यलो अलर्ट
Signs of Unseasonal Rain : Yellow Alert Issued for the State मुंबई (26 मार्च 2026) : अवकाळी पावसाची चाहूल लागली असून हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. उष्णतेसोबतच पावसाचा हा दुहेरी परिणाम अनेकांना जाणवू लागला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे.
काय आहे अंदाज ?
विशेषतः दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथेही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत गारपीटही झाली असल्याने शेतकर्यांसमोर नव्या संकटाची स्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळल्या असून काही ठिकाणी जोरदार वार्यांसह गारपीट झाल्याची नोंद आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकर्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे आधीच उष्णतेचा सामना करणार्या जनतेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
एका बाजूला ऊन आणि दुसर्या बाजूला पाऊस
काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार असल्याने हवामानाची ही दुहेरी स्थिती नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. एका बाजूला कडक ऊन आणि दुसर्या बाजूला अचानक पाऊस व वादळी वारे यामुळे वातावरण अस्थिर झाले आहे.




