रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यासाठी दबाव
मुंबई (26 मार्च 2026) : नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या असतानाच त्यांनी अलीकडेच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर आता पक्षातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी राजीनामा द्यावा म्हणून दबाव वाढला असल्याची सूत्रांची माहिती आहे.
वाढत्या दबावानंतर राजीनामा
अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. महिलांवरील अत्याचारांचे आरोप, व्हिडिओ क्लिप्स आणि विविध गंभीर गुन्ह्यांच्या चर्चेमुळे हे प्रकरण अधिकच गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर चाकणकर यांचे नाव समोर आले होते, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. या प्रकरणात चाकणकर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या अशोक खरातच्या तथाकथित दरबारात उपस्थित असल्याचे दिसल्याने वाद निर्माण झाला. याशिवाय त्यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याचेही आरोप झाले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना अशा प्रकारच्या वादात नाव येणे ही गंभीर बाब मानली गेली. अखेरीस वाढत्या दबावामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तो सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला मात्र राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणे दिली असून खरात प्रकरणाचा उल्लेख टाळला.

आहे ते पदही हातातून जाण्याची शक्यता
राजीनाम्यानंतरही त्यांच्यावरील दबाव कमी झालेला नाही. सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावर आहेत. मात्र, हे पदही त्यांच्या हातातून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकार्यांमध्ये याबाबत एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. चाकणकर यांच्या नावामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नेत्यांमध्ये आहे.
बैठकीत अनेक आमदारांची मागणी
दर मंगळवारी होणार्या पक्षाच्या बैठकीतही हा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला. देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत अनेक आमदारांनी चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेमुळे पक्षावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढत असून पुढील निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय घेतात? याकडे लक्ष लागले आहे.




