खासदार राऊतांचा धक्कादायक आरोप : भोंदूबाबापेक्षा त्याची सेवा करणारे राज्यकर्ते अधिक गुन्हेगार!


मुंबई (28 मार्च 2026) : नाशिकचा भोंदू अशोक खरातवरुन राज्यात राजकारण पेटलेले असता खासदार संजय राऊत यांनी यावर जोरदार टीका करीत भोंदूबाबाला भेटणार्‍या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, असे सांगून भोंदूबाबापेक्षा त्याची सेवा करणारे राज्यकर्ते अधिक गुन्हेगार, असल्याचा आरोप केला आहे.

काय म्हणाले राऊत ?
खासदार संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गॅसच्या रांगेत मारामार्‍या, लोक आजारी पडत आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणत आहेत की, गॅसची टंचाई आहे. आधी कॅबिनेटमध्ये एकमत काय आहे ते पहा. मुख्यमंत्री म्हणतात सगळे ठीक आहे आणि मंत्री म्हणतात गॅसची टंचाई आहे. त्यांनी म्हटले आहे की, विशिष्ट कालमर्यादे पलीकडे आम्ही गॅस पुरवू शकत नाही. सरकारमध्येच मतभेद आहेत. त्यांचेच लोक गॅसवर आहेत. पोलिस बंदोबस्तात गॅसचे वितरण करावे लागत आहे, हे कसले लक्षण आहे? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.


अफवांचा उगम गुजरातमधून
संजय राऊत म्हणाले, या अफवा कोण पसरवत आहे? या अफवांचा उगम गुजरातमधून आहे. सर्वात जास्त रांगा गुजरातमध्ये लावल्या जात आहेत. जसे नोटबंदी होण्यासंदर्भातील पहिली माहिती ही गुजरातमध्ये कळली आणि गुजरातमध्येच लोकांनी आठ दिवस आधीच बँकेत रांगा लावल्या. अमित शहांच्या बँकेत एका तासात 500 कोटी रुपये जमा झाले. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री गुजरातचे असल्यामुळे त्या राज्यात ही माहिती लवकर कळली. गुजरातमध्ये या रांगा लागल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रात धास्ती निर्माण झाली आहे. लॉकडाउन लागेल, गॅस टंचाई आहे, ही गुजरातवरून आलेली हवा आहे. गुजरातमध्ये मोठे मोठे ड्रम घेऊन लोक रांगेत उभे आहेत, असा दावाही राऊत यांनी केला.

अशोक खरातची सेवा करणारे राज्यकर्ते अधिक गुन्हेगार
अशोक खरात प्रकरणावर संजय राऊत म्हणाले की, सरकार अशोक खरातच्या मागे नसते तर हे जे 40 आमदार, खासदार, मंत्री तिथे सेवा करायला जात होते, त्यांची यादी सरकारने जाहीर केली असती. भोंदूबाबा पेक्षा त्याला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी अधिक गुन्हेगार आहेत. भोंदूबाबा तर आहेच, पण त्याच्या चरणाशी जाऊन सेवा करणारे जे आहेत, त्या राज्यकर्त्यांना अधिक अपराधी मानायला हवे त्यामुळे अशा सगळ्यांची यादी जाहीर व्हायला पाहिजे. इतर गुन्ह्यात गुन्हेगारांना मदत करणार्‍यांची नावे घेतली जातात, त्यांना चौकशीला बोलावले जाते. इथे दीपक केसरकरांना बोलावले? तटकरेंना बोलावले? रुपाली चाकणकर यांना बोलावले चौकशीला? एकनाथ शिंदेना बोलावले? राधाकृष्ण विखे पाटलांना बोलावले का चौकशीला? विचारा तर खरं त्यांना, तुम्ही का गेला होतात? कोणते विधी केले? त्याचा काय फायदा झाला? किती पैसे दिले? कुठून आले इतके पैसे? प्रश्न विचारला पाहिजे. अशोक खरातला अमित शहा यांच्यापर्यंत कोणी नेले? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

अशोक खरात मंत्रालयात कसा पोहोचतो?
फोटो कोणी कोणाबरोबर कधीही फोटो काढू शकतो, असे मुख्यमंत्री म्हणतात. मी मुख्यमंत्र्यांच्या मताशी सहमत आहे. तरीही माझा प्रश्न आहे, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, अशोक खरात सारखा भोंदूबाबा मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा पोहोचला? कोणीतरी मध्यस्थी आहे, कोणीतरी दलाल आहे, जे या सरकारमध्ये असून या भोंदुबाबला मदत करत आहे. अशोक खरात मंत्रालयात कसा पोहोचतो? अशोक खरात अनेक मंत्र्यांच्या कामात कसा हस्तक्षेप करत होता? हा प्रकाश एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा मुद्दा आहे, असे संजय राऊत म्हणाले.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !