राजकीय दबावातून आपल्याविरोधात गुन्हा ! आमदार एकनाथराव खडसेंनी फेटाळले आरोप

रेडी रेकनर दरानुसारच जमिनीची खरेदी : 24 वर्षानंतर सुड बुद्धीने दाखल केला गुन्हा


Case Registered Against Me Under Political Pressure! MLA Eknathrao Khadse Refutes Allegations. मुक्ताईनगर (30 मार्च 2026)  : वरणगावजवळील मानपूर येथील जमीन प्रकरणी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे व त्यांची कन्या शारदा चौधरी यांच्याविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर या संदर्भात त्यांनी प्रसिद्धी माध्यमांपुढे भूमिका मांडत आरोप फेटाळले आहे. ती जमीन महार वतनाची नसून सातबारा उतार्‍यावर वर्ग एकची जमीन असाच उल्लेख असून शासनाची दिशाभूल करुन गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा आमदार खडसे यांनी केला आहे.

काय म्हणाले आमदार खडसे ?
आमदार खडसे म्हणाले की, वास्तविक या जमिनीची खरेदी 2002 मध्ये झाली मात्र 24 वर्षानंतर आपल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा व्यवहार खाजगी असून शासन मान्यतेने व्यवहार झाला शिवाय रेडी रेकनर दरानुसार खरेदी व स्टॅम्प ड्युटी त्यावेळी देण्यात आली मात्र केवळ आपल्याला राजकीयदृष्ट्या त्रास देण्याच्या उद्देशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कायदेशीर प्रक्रियेअंती जमिनीची खरेदी
आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले की, या जमीन व्यवहारांमध्ये त्यांचा कोणताही थेट किंवा दुरान्वये संबंध नाही. संबंधित जमीन त्यांच्या कन्या शारदा खडसे यांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार खरेदी केली आहे. जमीन खरेदी करताना ती वर्ग-1 स्वरूपाची असल्यानेच व्यवहार करण्यात आला.

याचबरोबर सातबारा उतार्‍यावर संबंधित जमीन महार वतनाची नसून वर्ग-1 जमीन असल्याचे नमूद आहे, असे सांगत खडसेंनी तक्रारदारांवर शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. इतकेच नव्हे, तर यापूर्वी विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर महसूल मंत्र्यांनीही ही बाब स्पष्ट केल्याचा दावा त्यांनी केला.

या प्रकरणात साखर कारखान्याच्या नावाखाली जमीन खरेदी केल्याचा आरोप होत असताना खडसे यांनी वेगळाच खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही जमीन साखर कारखान्यासाठी नव्हे तर इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी खाजगीरित्या आणि नियमानुसार खरेदी करण्यात आली त्यामुळे फसवणूक किंवा अन्य कोणताही गैरप्रकार झालेला नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात तब्बल 24 वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याबाबतही खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. एवढ्या कालावधीनंतर अचानक कारवाई का करण्यात आली, यामागे राजकीय हेतू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. केवळ राजकीय दबाव आणि त्रास देण्याच्या उद्देशानेच हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

एकीकडे तक्रारदारांनी फसवणूक आणि अ‍ॅट्रॉसिटीचा आरोप करत गुन्हा दाखल केला असताना, दुसरीकडे खडसे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हा संपूर्ण प्रकार राजकीय सूडाचा भाग असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके सत्य काय आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !