अभियंता वा राजकारणात नसतो तर मी असतो कवी….! भुसावळात मंत्री संजय सावकारे

प्रतिष्ठा महिला मंडळतर्फे ‘चैत्रपालवी’ काव्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद


“Had I not been an engineer or a politician, I would have been a poet!” — C in Bhusawal. भुसावळ (30 मार्च 2026) : भावना व्यक्त करण्याचे उत्तम साधन म्हणजे कविता व गझल आहे. मला स्वतःलादेखील गझलेची आवड असून मुशायरा कुठेही असलातरी वेळ असल्यास आपला जाण्याचा प्रयत्न असतो व कदाचित अभियंता वा राजकारणात आलो नसतोतरी मीदेखील एक आपल्यासारखा कवी असतो, अशी प्रांजल भावना भुसावळचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केली. निमित्त होते ते भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजित ‘चैत्रपालवी’ या बहुभाषिक कवी संमेलनाचे !

पहिल्याच कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सामाजिक उपक्रमासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे शहरातील ब्राह्मण संघात रविवारी सायंकाळी ‘चैत्रपालवी’ या बहुभाषिक पहिल्याच कवी संमेलनाचे मंत्री संजय सावकारे यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले. यावेळी सुनीत पासून गझलपर्यंत विविध काव्य प्रकार कवींनी सादर करीत वाहव्वा मिळवली.


मानवी मनाला वाट मोकळी करुन देण्याचे काम कवितेत
मंत्री सावकारे म्हणाले की, कविता मानवी भावनेला वाट मोकळी करून देण्याचे काम करते. माणसाच्या मनात विचार भावना साठून राहिल्या असत्या तर माणूस जिवंतपणी निर्जीव झाला असता. कोणत्याही प्रसंगाचे, घटनेचे, निसर्गाचे वर्णन करण्याचे सर्वोत्तम माध्यम कविता असते. कविता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुक्त प्रकार आहे. कवितेचा मूळ उद्देश मानवी स्थितीचा शोध घेऊन शब्दांद्वारे भावनांना आमंत्रण देणे आहे.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, साहित्यिक किसन वराडे, उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, डॉ.रश्मी शर्मा, प्रतिष्ठा मंडळाच्याअध्यक्षा रजनी सावकारे, डॉ.सुषमा खानापुरकर, प्रा.संध्या महाजन, जयश्री काळवीट आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

आजही संवेदनशील जनमानसात कवितेला मानाचे स्थान : प्रा.किसन वराडे
कमीत-कमी शब्दात जास्तीत जास्त आशय कवितेतुन मांडला जातो त्यामुळे आजही संवेदनशील जनमानसात कवितेला मानाचे स्थान आहे. असे मत अंबरनाथ येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसन वराडे यांनी यावेळी व्यक्त केले. वराडे पुढे म्हणाले की, पूर्वापार काळापासून साहित्यात कवितेला अग्रस्थान देण्यात आले आहे. आद्य ग्रंथ निर्मिती काव्यातूनच झाली आहे. आयुष्यात जितके दु:ख सोसलेले, अनुभवलेले असते तितके ते अधिक तीव्रतेने कवीच्या लेखणीतून उतरत असते. त्याचप्रमाणे निसर्गात घडुन येणारे बदल मानवी मनाला भुरळ घालतात कवी त्याला शब्द रुप देतात.

निमंत्रीत कविंचा सन्मान
डॉ.सुषमा खानापुरकर, खानदेश साहित्य संघ भुसावळ शाखेच्या अध्यक्षा जयश्री काळवीट, जळगाव शाखेच्या अध्यक्षा प्रा.संध्या महाजन यांचेही यावेळी भाषण झाले. याप्रसंगी कवी घनःश्याम सावरकर यांच्या ‘बाप वाट पाही’ या काव्य संग्रहाचे मंत्री सावकारे यांच्याहस्ते प्रकाशन झाले तर निमंत्रित कवींचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

भर उकाड्यात शब्दांनी मिळाला गारवा
16 कवींच्या सुनीत पासुन गझल पर्यंत तसेच शेती पासुन लेकीपर्यंत विविध कवितांच्या चैत्रपालवीने रसिकांना भर उकाड्यात शब्दांचा गारवा दिला. प्रा.संध्या महाजन यांनी शेतकरी ही लेवा गण बोलीतील कविता गाऊन सादर करत रसिकांची दाद मिळवली. ज्योती वाघ, हारून उस्मानी (गझल), घनःश्याम सावरकर (रोडग्याची पंगत), श्रीकांत जोशी (जीवनात रस नाही), राजेंद्र जावळे (चिऊताई), सुनीता येवले (शेतकरी), ज्योती राणे (चैत्रपालवी), वैशाली गाडगीळ (मैत्रीण), ललिता टोके (यशाची त्रिवेणी), जयश्री काळवीट (मुली), संध्या भोळे (चैत्रांगण), प्रकाश पाटील (आई सांग ना माझा गुन्हा), डॉ. मिलिंद धांडे (लेवा गणबोली), सीमा भारंबे (माझा खानदेश), नीलिमा नेहेते (नववधु शृंगार), प्रा.किसन वराडे (कधी तरी सत्वर आवरावे लागते) अशा दर्जेदार कवितांचे सादरीकरण करत उपस्थित रसिकांची दाद मिळवली.

प्रतिष्ठा मंडळाचा स्तुत्य उपक्रम
राजेंद्र जावळे यांना सावकारे यांना ‘चैत्रपालवी’ कविसंमेलन प्रतिमा भेट दिली. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी प्रास्ताविक केले. राजश्री देशमुख व संध्या भोळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.संध्या महाजन यांनी मंडळाच्या विविधांगी उपक्रमाचे कौतुक करीत प्रथमच झालेल्या कवी संमेलनाचे कौतुक करीत आयोजकांचे आभार मानले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !