भोंदू अशोक खरातच्या कार्यालयातून औषधाची बाटली, विविध प्रकारच्या आकारांचे खडे जप्त
Medicine bottle and stones of various shapes seized from the office of the charlatan Ashok Kharat नाशिक (30 मार्च 2026) : राज्यात चर्चेत असलेला नाशिकचा भोंदू अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयातून एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमने काही औषधाच्या बाटल्या, विविध प्रकारचे खडे व अन्य वस्तू जप्त केल्या आहेत. अशोक खरातने याच कार्यालयात 150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केले असून पीडित महिलांचे कुठे लैंगिक शोषण केले, याबाबतची माहिती देखील एसआयटीकडून जाणून घेण्यात आली.
औषधासह खडे जप्त
फिर्यादीला घेऊन एसआयटीचे घटनास्थळी दाखल पथक झाले होते. ओकस प्रॉपर्टी कार्यालयात सोमवारी एसआयटीकडून झाडाझडती घेण्यात आली. यावेळी अशोक खरातच्या ऑफिसमधून एसआयटीने महत्वाचे पुरावे गोळा केले. यामध्ये औषधाची बाटली, विविध प्रकारच्या आकारांचे खडे आणि इतर वस्तू आढळून आल्या. या सर्व वस्तू एसआयटीने जप्त केल्या. पीडित महिलांना घेऊन एसआटी आली तेव्हा घटनाक्रम जाणून घेत मोबाईलमध्ये लाईव्ह स्क्रीनिंग केले. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनसह एसआयटीने डिजिटल पंचनामा केला. अशोक खरातच्या विरोधात लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात वाढ होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत अशोक खरातवर 8 लैंगिक शोषणाचे तर दोन आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत.

प्रभावशाली व्यक्तींची मोबाईलमध्ये नावे
अशोक खरातच्या मोबाईलमधून अनेक धागेदोरे समोर येत आहेत. अशोक खरातच्या मोबाइलमध्ये अडीच हजारांहून अधिक नंबर कोडवर्डमध्ये सेव्ह असल्याने या प्रकरणाचा तपास अधिक गूढ बनला आहे. अशोक खरातचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. मोबाईलमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावे ‘डमी’ स्वरूपात सेव्ह करण्यात आल्याचा संशय आहे तर अशोक खरातने पीडित महिलांचे नंबरही सेव्ह केलेले नसून त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तो वेगळ्या मोबाईलचा वापर करत होता, अशी माहितीही समोर आली आहे.




