रुपाली चाकणकर एसआयटी समितीपुढे गैरहजर ; दमानिया म्हणाल्या, दिलेले कारण क्षुल्लक


Rupali Chakankar Absent Before SIT Committee; Damaniya Calls Reason Given ‘Trivial’ मुंबई (30 मार्च 2026) : नाशिकच्या भोंदू प्रकरणात अडचणी वाढलेल्या रुपाली चाकणकर एसआयटीपुढे हजर न झाल्याने आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चाकणकरांवर टीका केली आहे. त्यांनी दिलेले कारण अत्यंत विक्षिप्त व क्षुल्लक असल्याचा आरोप दमानियांनी केला.

एसआयटी पुढे जाण्यास टाळाटाळ
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणार्‍या एसआयटीपुढे हजर राहण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. आज त्यांची या प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता होती. पण त्यांनी महिला असल्यामुळे प्रवास करण्यास असमर्थ असल्याचे नमूद करत ही चौकशी टाळली..


पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप
रुपाली चाकणकर ह्या भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवर सदस्या आहेत. त्यांच्यावर भोंदू खरातचे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचाही आरोप आहे. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांना प्रथम राज्य महिला आयोग व त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास करणार्‍या एसआयटीने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले. त्यानुसार आज त्या चौकशीसाठी हजर राहणे अपेक्षित होते. पण त्यांनी चौकशीसाठी हजर राहणे टाळल्याने त्यांच्या हेतूवर संशय व्यक्त केला जात आहे.

चाकणकरांचे कारण अत्यंत विक्षिप्त अन् क्षुल्लक
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चाकणकरांवर हल्ला चढवत त्यांनी चौकशीला गैरहजर राहण्यासाठी फार किरकोळ कारण दिल्याचा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, रुपाली चाकणकरांना एसआयटीने समन्स बजावला होता. पण आता कळत आहे की, त्या एसआयटीपुढे जाणार नाहीत. त्यासाठी त्यांनी कारण एवढे क्षुल्लक व विक्षिप्त दिले गेले की, मी एक महिला आहे व मला प्रवास करायला त्रास होईल. हे कारण नक्कीच असू शकत नाही. कारण, याच रुपाली चाकणकरांना आपण तिथे अनेकदा जाताना पाहिले आहे. त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ पाहिलेत. त्यांचे पदराने पाय पुसतानाचे व्हिडिओ पाहिलेत. केक खातानाचे व्हिडिओ पाहिलेत.

महिला व बालक कल्याण मंत्री मौन का?
अंजली दमानिया यांनी यावेळी या प्रकरणी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. महिला व बालकल्याण मंत्री यांना एक साधा प्रश्न. अशोक खरातांच्या प्रकरणावर तुमचं मौन का? एक महिला व बालकल्याण मंत्री म्हणून त्या इतक्या गंभीर प्रकरणावर काहीच कसे बोलत नाहीत? असा प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !