एमआयडीसी पोलिसांची कारवाई : सिल्लोडचे दोघे गावठी कट्टा व काडतूसांसह जाळ्यात


MIDC Police Action : Two from Sillod Nabbed with Country-made Pistol and Cartridges जळगाव (31 मार्च 2026) : गावठी कट्टा, तीन जिवंत काडतूसांसह सिल्लोडच्या दोघांना जळगाव एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. दीपक ठकुबा गुंजाळ (28, रा. दुर्गानगर, सिल्लोड, जि.छत्रपती संभाजीनगर) व विठ्ठल रंगनाथ सोनवणे (25, रा.दुर्गानगर, सिल्लोड, जि.छत्रपती संभाजीनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
एअरपोर्ट रस्त्यावर एक तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला सूचना केल्या. गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, विशाल कोळी आणि नितीन ठाकूर यांच्या पथकाने एअरपोर्ट जवळील तारा बिझनेस पार्क परिसरात सापळा रचत शनिवार, 28 मार्च 2026 रोजी रात्रीच्या सुमारास एका पल्सर मोटारसायकलवर दोन संशयित येताच त्यांना थांबण्याचा इशारा केला मात्र संशयीत पळू लागल्याने पथकाने शिताफीने पाठलाग करून त्यांना पकडले. अंग झडतीत कमरेला लावलेला एक गावठी कट्टा आणि खिशात तीन जिवंत काडतुसे मिळून आली. आरोपींकडून एक लाखांच्या दुचाकीसह गावठी कट्टा, तीन काडतूस, मोबाईल मिळून एकूण एक लाख हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपींनी हा कट्टा अजय बिरुजू गारुंगे (तांबापूरा, जळगाव) कडून खरेदी केल्याची कबुली दिली असून संशयीत पसार झाला आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !