भुसावळ विभागातील 24 कर्मचार्यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप
भुसावळ (31 मार्च 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील 24 कर्मचार्यांना सेवानिवृत्तीनिमित्त मंडल रेल प्रबंधक कार्यालयातील वसुधरा सभागृहात एक औपचारिक सत्कार समारंभात सोमवारी निरोप देण्यात आला.
दीर्घकाळ रेल्वे सेवेत कार्यरत राहिल्यानंतर भुसावळ विभागातील एकूण 24 कर्मचारी सोमवारी सेवानिवृत्त झाले. या सर्व सेवानिवृत्त कर्मचार्यांना रेल्वे प्रशासनामार्फत तत्काळ एकूण आठ कोटी 57 लाख 58 हजार 150 इतकी सेवानिवृत्ती लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.

अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल होते. त्यांनी सेवानिवृत्त कर्मचार्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या दीर्घ सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते पीपीओचे वितरण करण्यात आले.
वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी दिलीप आर.खरात यांनी उपस्थितांना संबोधित करत सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मार्गदर्शन केले व सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या पेन्शन सुरक्षेसंदर्भात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सावधान सीनियर्स या माहितीपत्रिकेचे प्रकाशन पुनीत अग्रवाल यांच्याहस्ते करण्यात आले. या पत्रिकेमध्ये सध्या वाढत्या सायबर व ऑनलाईन फसवणुकीबाबत उपयुक्त माहिती देण्यात आलेली आहे. या उपक्रमामुळे सेवानिवृत्त पेन्शनधारकांना निश्चितच लाभ होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेटलमेंट व कार्मिक विभागातील सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.




