भुसावळातील बॉटनिकल गार्डन प्रकरणी अधिकार्‍यांवर कारवाईची शिफारस

शासनाच्या नियमांना हरताळ ; उद्घाटन व लोकार्पण बेकायदेशीर


भुसावळ (1 एप्रिल 2026) :  भुसावळ नगरपरिषद प्रशासनाने शासनाच्या स्पष्ट नियमांचे उल्लंघन करत शहर हद्दीतील प्रभाग क्रमांक 13 मधील बॉटनिकल गार्डन प्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुख्याधिकारी व नगर अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली असून, याबाबत नगर विकास विभागाने जिल्हाधिकारी, जळगाव यांना निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रकरण ?
प्राप्त माहितीनुसार, बॉटनिकल गार्डन प्रकल्पाचे काम पूर्ण न होता तसेच कम्पिशन सर्टीफिकेट (पूर्णता प्रमाणपत्र) न घेता उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. शासनाच्या बांधकाम नियमावलीनुसार कोणत्याही शासकीय अथवा नगरपरिषदेच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यापूर्वी संबंधित विभागाची अधिकृत परवानगी आवश्यक असते मात्र भुसावळ नगरपरिषद प्रशासनाने ही परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केल्याचे निदर्शनास आले आहे.


या प्रकरणामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला असून, उद्घाटनावेळी झालेल्या खर्चासह शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याची तक्रार भुसावळातील पं.दिनेश शंकरलाल उपाध्याय यांनी केली होती. याबाबत विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर नगर विकास विभागाने संपूर्ण प्रकरणाची दखल घेत चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिल्याने खळबळ उडाली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !