अज्ञात वाहनाच्या धडकेने ममुराबादला पादचारी ठार
Pedestrian Killed in Collision with Unidentified Vehicle at Mamurabad जळगाव (2 एप्रिल 2026) : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ममुराबाद येथील रहिवासी राजेंद्र शांताराम पाटील (वय 48) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणार्या राजेंद्र यांची प्राणज्योत बुधवार, 1 एप्रिल रोजी मालवली.
अज्ञात वाहनाने दिली धडक
24 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास राजेंद्र पाटील हे फुपनगरी फाट्याकडून कानळदा गावाकडे पायी जात असताना पाठीमागून येणार्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याने राजेंद्र पाटील हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच त्यांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने बुधवार, 1 एप्रिल रोजी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी मयताचे भाऊ महेश शांताराम पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.








