श्री बालाजी महाराजांच्या जयघोषात यावलला रथोत्सव मिरवणुकीला सुरुवात
यावल (3 एप्रिल 2026) : शहरातील श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सव मिरवणुकीस गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता सुरवात झाली. शहरातील प्रसिद्ध श्री महर्षी व्यास मंदिराच्या पायथ्यालगतच्या हरीता-सरीता नद्यांच्या संगम पात्रातून पारंपरीक पध्दतीने पूजा-अर्चा करीत भाविक-भक्तांनी रथ ओढला व साडेसात वाजेला हा रथ महाराणा प्रताप नगराजवळ दाखल झाला. तत्पूर्वी चोपडा रस्त्यावरून खंडेराव महाराजांच्या बारागाड्या उत्साहात ओढण्यात आल्या. त्याचवेळी पाऊस सुरू झाल्याने एकचं तारांबळ उडाली. या यात्रोत्सवात हजारोंच्या संख्येत भाविक-भक्तांची उपस्थिती होती. पहाटे या रथोत्सवाची सांगता होणार आहे.
120 वर्षांची परंपरा
यावल शहरात 120 वर्षांपूर्वीची रथोत्सव परंपरा आहे. दरवर्षी श्री हनुमान जयंती निमित्ताने शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या पायथ्याशी हरीता- सरीता नदीत यात्रेचे आयोजन केले जाते. यंदा गुरुवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात रथ पूजन माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख व सुनंदा देशमुख यांच्याहस्ते पार पडली. संपुर्ण धार्मिक विधी व पुजना करीता महेश बयाणी, राजेश बयाणी, अर्थव बयाणी, मोरेश्वर बयाणी, विनोद बयाणी व सुनील जोशी, महाराज यांची उपस्थिती होती. पूजनानंतर रथ ओढण्यास सुरवात झाली.


पूजा-अर्चासह नारळांचा स्वीकार
रथ शहरातुन मार्गस्त होतांना पुजा-अर्चा व नारळांचा स्विकार रथावरील भटजी मंडळी कडून करण्यात आला.तर भालदार व चोपदार यांनी रात्रभर रथ सेवे करीता विशेष वेशभुषेत हजर राहुन परिश्रम घेतले. या रथाचे शहरातील महाराणा प्रताप नगरात आगमन झाल्यावर रथाचे स्वागत विविध सामाजिक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व शांतता समिती सदस्य यांनी केले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
या रथोत्सवात फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहायक पोलिस उपनिरिक्षक अजयकुमार वाढवे, उपनिरिक्षक अनिल महाजन सह सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. सायंकाळी आलेल्या पावसामुळे मोठी तारांबळ उडाली.






