मंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा : भोंदू खरातमुळे अनेकांनी जीवही दिला !


नाशिक (3 एप्रिल 2026) : नाशिकमधील भोंदू अशोक खरातने अनेक महिलांवर अत्याचार करीत आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली होती. त्यातच आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी खळबळजनक दावा केल्यानंतर या प्रकरणात आता अधिक गांभीर्य वाढले आहे. मंत्री शिरसाट यांनी भोंदू खरातमुळे अनेकांनी जीव दिल्याचा दावा केला आहे.

काय म्हणाले मंत्री शिरसाट ?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अशोक खरातला तब्बल 17 वेळा फोन केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. पत्रकारांनी याविषयी मंत्री संजय शिरसाट यांना छेडले असता त्यांनी थोडी कळ काढा या प्रकरणी सर्व पर्दाफाश होईल असे स्पष्ट केले. ते म्हणाले, भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे. एका महिला अधिकार्‍याने हे सर्व प्रकरण उजेडात आणले आहे. त्याची चौकशी अत्यंत योग्य पद्धतीने सुरू आहे.



हा भोंदू बाबा एका प्रकरणात अडकलेला नाही, तर अनेक प्रकरणांत अडकलेला असून बलात्कार व मनी लाँड्रिंगच नाही, तर आणखी काही प्रकरणे पुढे येत आहेत. काही लोकांनी जीव देण्याचेही प्रकार समोर येत आहेत त्यामुळे मी सर्वांना विनंती करत आहे की, त्याला राजकारणाकडे वळण देऊ नका. हे सर्व पाहता आपण खरातला वाचवतो की काय? असे वाटते.

सर्वांवर 100 टक्के गुन्हा दाखल होईल
संजय शिरसाट म्हणाले, प्रस्तुत प्रकरणात अशोक खरात राहिला बाजूला आणि इतरांवरच आरोप प्रत्यारोप होत आहेत. जे काही चौकशीत समोर येईल, मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणताही नेता असू द्या. सरकार त्याच्यावर कारवाई करेल. त्याची कुणीही चिंता करू नये. सध्या रोज एकच विषय चालू आहे खरात व त्याच्याशी संबंधित असणार्‍या पुढार्‍यांचा. पुढारी असतील किंवा अधिकारी ज्यांचा – ज्यांचा या प्रकरणात समावेश असेल, त्या सर्वांवर कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणात हात असलेल्या लोकांवर 100 टक्के गुन्हा दाखल केला जाईल, हे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपण प्रतिक्षा केली पाहिजे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !