अंजली दमानियांचा दावा : भोंदू खरातला उपमुख्यमंत्री शिंदे यांचे 17 तर रुपाली चाकणकरांचे 177 कॉल
Anjali Damania Claims: Fraudster Kharat Received 17 Calls from Deputy Chief Minister Shinde and 177 from Rupali Chakankar. मुंबई (3 एप्रिल 2026) : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळजनक दावा केल्याने राज्यात आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अशोक खरात यांच्यात 17 वेळा फोनवरून बोलणे झाले असून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही खरातला एक-दोन नव्हे तर तब्बल 177 वेळा फोन केल्याचा दावा दमानिया यांनी करीत या संदर्भातील कॉलच्या सीडीआरची लिस्ट एसआयटीकडे सोपवली आहे.
काय आहे दमानियांचा दावा ?
अंजली दमानिया शुक्रवारी यासंबंधी बोलताना म्हणाल्या, कोणताही विषय लढण्यास सुरुवात केल्यानंतर माझ्याकडे बरीच माहिती येते. असाच काहीसा प्रकार आत्ता झाला आहे. अशोक खरातच्या प्रकरणाची खूप मोठी माहिती माझ्याकडे येत आहे. ती मी माध्यमांनाही देत आहे. पण काही कारणामुळे मी आता चंदीगडला आले आहे. लग्नानिमित्त रविवारपर्यंत मी परत येणार नव्हते, म्हणून मला वाटले की ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. मला एक सीडीआरची कॉपी मिळाली आहे. ही कॉपी व्हॉट्सअॅपवर ज्यांनी पाठवली, त्यांना मी ओळखत नाही. पण मी ती पोलिस महासंचालक व मुख्यमंत्र्यांना पाठवली. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनाही मी ही माहिती दिली.


चाकणकरांचे 177 कॉल्स
काल दिवसभरात मी माहिती थोडीशी संकलित केली. त्यात मला धक्कादायक माहिती मिळाली. रुपाली चाकणकर आतापर्यंत म्हणायच्या की, अशोक खरात हे माझे गुरू आहेत. मला त्यांच्याविषयी फार काही माहिती पण चाकणकरांनी खरातला सुमारे 177 कॉल्स केल्याची माहिती माझ्याकडे आहे. एवढेच नाही तर त्यांच्या भगिणी प्रतिभा चाकणकर यांचेही तब्बल 236 कॉल्स खरातला गेले.
एकनाथ शिंदे-खरातमध्ये 17 वेळा बोलणे
अंजली दमानिया म्हणाल्या, प्रस्तुत प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आतापर्यंत केवळ फोटो व व्हिडिओ पाहिले. पण शिंदे यांनी अशोक खरातला तब्बल 17 कॉल केल्याची माहिती माझ्याकडे आहे. हे सर्व नॉर्मल फोन कॉल्स आहेत. त्यांच्यात व्हॉट्सअॅप किंवा इतर माध्यमातून किती कॉल झाले याची माहिती मला नाही. पण 17 पैकी 10 इनकमिंग व 7 आऊटगोईंग कॉल होते. त्यात एकदा दोघांत तब्बल 21 मिनिटांचे संभाषण झाले. ही सगळी माहिती एक जबाबदार नागरीक म्हणून मी यंत्रणांना दिली. माझी ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची इ्च्छा होती. त्यामुळे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे. यात माझा दुसरा कोणताही हेतू नाही.
चंद्रकांत पाटील, तटकरे, शेलारचाही फोन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अशोक खरातसारख्या व्यक्तीशी 17 वेळा फोन करत असतील तर त्यांनी ते कशासाठी केले याचे उत्तर त्यांनी देण्याची गरज आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील तसेच सुनील तटकरे यांचे प्रत्येकीआठ कॉल्स आहेत. आशिष शेलार यांचाही एक कॉल आहे. हे सर्व नॉर्मल कॉल्स आहेत. कारण, व्हॉट्सअॅप कॉल्सची माहिती आपल्याला मिळू शकत नाही. या लोकांनी एकमेकांशी नॉर्मल कॉल एवढे केले असतील तर व्हॉट्सअॅपवरून किती संभाषण केले असेल हे सांगता येत नाही, असे दमानिया म्हणाल्या.
चाकणकर- खरात यांच्यात 33,727 सेकंद संभाषण
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, प्रस्तुत सीडीआरमध्ये अशोक खरात व तृप्ती खरात यांच्यात सर्वाधिक वेळा बोलणे झाल्याचे नमूद आहे. कुटुंबातील व्यक्तीशी जास्त बोलणे होते, हे आपण समजू शकतो. पण त्यानंतर दुसर्या क्रमांकावर रुपाली चाकणकर यांचे नाव आहे. त्यांनी सुमारे 33 हजार 727 सेकंद एवढे संभाषण खरातशी साधले आहे. त्यामुळे चाकणकरांना अटक करून त्यांची चौकशी झाली पाहिजे. सर्वप्रथम त्यांच्यावर एफआयआर दाखल करून अटक झाली पाहिजे. एवढा वेळ कुणीही आपल्या गुरुशी बोलू शकत नाही. दोघांमध्ये एवढे मोठे संभाषण होत असेल, तर ती काय बोलत होती? याची चौकशी डेफिनेटली झाली पाहिजे.






