जळगाव हादरले : सात लाखांची रोकड असलेले एटीएम सात मिनिटात लांबवले
Jalgaon Rocked: ATM Containing ₹7 Lakh in Cash Stolen in Just Seven Minutes जळगाव (4 एप्रिल 2026) : एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेशी ठरावी, अशी घटना जळगावात घडली. अवघ्या सात मिनिटात चोरट्यांनी सिनेस्टाईल सात लाखांची रोकड असलेले एटीएम चोरीच्या वाहनातून लांबवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. या घटनेने एटीएम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
अवघ्या सात मिनिटात चोरी
जळगावच्या पोलन पेठ चौकातील सत्यम प्लाझा येथे ‘एक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे एटीएम असून गुरुवारी रात्री 1.25 वाजेच्या सुमारास चोरीच्या वाहनातून आलेल्या चोरट्यांनी सात मिनिटात काम फत्ते केले. सुरुवातीला एटीएम कॅमेर्यावर स्प्रे मारल्यानंतर दोरखंडाने एटीएम बांधल्यानंतर त्यास वाहनात टाकून चोरटे पसार झाले.


जोशी पेठेतून चोरले वाहन
एटीएम चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. गुरुवार, 3 एप्रिल रोजी मध्यरात्री 1.25 वाजता चोरटे दाखल झाले तर तत्पूर्वी चोरट्यांनी जोशी पेठ भागातून पिकअप वाहन चोरले. त्यानंतर ते पोलन पेठेतील सत्यम प्लाझामध्ये असलेल्या बँकेच्या एटीएम केंद्रावर पोहोचले. मध्यरात्री 1.25 वाजता एक संशयित चोरटा तोंडाला रुमाल बांधून आत शिरला. त्याने अतिशय सराईतपणे एटीएम मशीनला जाडजूड दोरखंड बांधला. बाहेर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला हा दोर जोडून जोरात हिसका देताच मशीन जमिनीवरून उखडले गेले.
सात मिनिटात चोरटे पसार
मशीन खाली पडताच बाहेर दबा धरून बसलेले इतर तीन साथीदार आत शिरले. अवघ्या सहा मिनिटांत म्हणजेच मध्यरात्री 1.32 वाजेपर्यंत त्यांनी वजनाने जड असलेली एटीएम मशीन उचलून मालवाहू वाहनात टाकले आणि भुसावळच्या दिशेने पोबारा केला. हा सर्व प्रकार इतक्या वेगाने घडला की, कुणालाही शंका आली नाही.
मन्यारखेडा शिवारात मशीन आढळले:
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. काही वेळाने कंडारीनजीक असलेल्या मन्यारखेडा शिवारात चोरलेले मालवाहू वाहन आणि फोडलेल्या अवस्थेत एटीएम मशीन पोलिसांना आढळून आले मात्र चोरट्यांनी मशीनमधील अंदाजे सात लाख रुपयांची रोकड काढून घेतली होती आणि तेथून ते गायब झाले.
सुटीमुळे एटीएममध्ये दुप्पट रक्कम
बँकेचे शाखा व्यवस्थापक हरीश गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, 2 एप्रिल रोजी मशीनमध्ये 10 लाख भरण्यात आले होते. चोरी झाली. तेव्हा त्यात 7 लाख रुपये शिल्लक असावेत असा अंदाज आहे. सात लाखांची रोकड आणि अडीच लाखांचे मशीन, असे एकूण 9 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.





