नाशिकमध्ये अशोक खरातचा पार्ट टू : 121 महिलांवर संस्था चालकाचा अत्याचार
फिर्यादीच निघाला आरोपी ; एक टॅब, चार मोबाईल जप्त
Ashok Kharat Part 2 in Nashik : Institution Operator Abuses 121 Women नाशिक (4 एप्रिल 2026) : राज्यात गाजत असलेल्या नाशिमधील भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर आता नाशिकमध्ये एका संस्था चालकाने तब्बल 121 महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून तब्बल 121 महिलांचे लैंगिक शोषण केल्याने 63 वर्षीय रवींद्र गणपत एरंडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आधी दिली खंडणीची तक्रार
पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवून ते ब्लू फिल्म माफियांकडे विकल्याचा पोलिसांना दाट संशय असून, या प्रकारामुळे खरात प्रकरणानंतर महाराष्ट्राला दुसरा हादरा बसला आहे. आरोपी रवींद्र एरंडे याने स्वतःला वाचवण्यासाठी आणि समोरच्यांना अडकवण्यासाठी आधी सातपूर पोलिसांत खंडणीची खोटी तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून चार जणांना अटकही केली मात्र तपासादरम्यान संशय बळावल्याने पोलिसांनी एरंडेचा ‘टॅब’ तपासला. तेव्हा त्यात 81 अश्लील व्हिडिओ आढळले.


गरजू महिलांना हेरून शोषण
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार एरंडे याने समाजातील कष्टकरी आणि गरजू महिलांना लक्ष्य केले होते. मुलाला सरकारी नोकरी लावून देतो किंवा तुझे भविष्य उज्ज्वल करतो, असे आमिष तो दाखवायचा. नाशिक आणि इगतपुरीतील विविध हॉटेल्समध्ये नेऊन तो महिलांवर अत्याचार करायचा. धक्कादायक म्हणजे, या अत्याचाराचे तो गुपचूप चित्रीकरणही करत असे. पोलिसांनी त्याच्याकडून चार मोबाईल, दोन पेनड्राइव्ह आणि एक मेमरी कार्ड जप्त केले.





