भुसावळ पालिकेच्या पहिल्याच बैठकीत भाजपाची 177 विषयांवर हरकत : 12 एप्रिलच्या आत येणार निकाल
BJP Raises Objections on 177 Agenda Items During Bhusawal Municipal Council’s Very First Meeting: Verdict Expected by April 12 भुसावळ (4 एप्रिल 2026) : भुसावळ नगरपालिकेच्या पहिल्या सभेतील 177 विषयांवर भाजपाने घेतलेल्या हरकतींप्रकरणी जिल्हाधिकार्यांकडे सुनावणी सुरू असून नुकत्याच झालेल्या अंतिम सुनावणीनंतर रविवार, 12 एप्रिलच्या आता जिल्हाधिकारी रोहन घुगे आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी काय निर्णय जाहीर करतात ? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
भाजपाने घेतली हरकत
भुसावळ पालिकेत सत्तांतरानंतर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्याच सभेत 250 हून अधिक विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. यातील तब्बल 177 विषयांवर भाजपाने आक्षेप घेत हे विषय पक्षपाती व नियमबाह्य असल्याचा दावा करत महाराष्ट्र राज्य नगरपालिका अधिनियम 1965 च्या कलम 308 अंतर्गत जिल्हाधिकार्यांकडे अपिल दाखल केले व त्यानंतर या विषयांवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली.


पुन्हा झाला युक्तीवाद
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या दालनात नुकतीच सुनावणी झाली. सुमारे सात वाजेपर्यंत चाललेल्या या सुनावणीत दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. भाजपातर्फे अॅड. भगवती गामोट यांनी आक्षेप नोंदवत संबंधित विषयांमध्ये असलेल्या त्रृट्यांचा मुद्दा उपस्थित केला तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे अॅड. कात्यायनी यांनी हे सर्व विषय शहराच्या विकासाशी संबंधित असल्याचे सांगत त्यांचे समर्थन केले.
तोपर्यंत 177 विषयांना स्थगिती
दोन्ही बाजूंचे मुद्दे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणाचा अंतिम निर्णय 12 एप्रिल रोजी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तोपर्यंत संबंधित 177 विषयांवरील स्थगिती कायम राहणार असल्याने सत्ताधार्यांना या विषयांवर कोणतीही पुढील कार्यवाही करता येणार नाही.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य नगरपालिका अधिनियम 1965 च्या कलम 308 नुसार अशा अपिलांवर एका महिन्याच्या आत निर्णय देणे बंधनकारक असल्याने या निकालाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या निर्णयावर पालिकेच्या पुढील कामकाजाची दिशा ठरणार असून, राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. एकूणच, ‘लाडका नगरसेवक’ वादातून पेटलेल्या या प्रकरणाचा 12 एप्रिलचा निकाल भुसावळ पालिकेच्या राजकारणाला नवी कलाटणी देणारा ठरणार आहे.





