भुसावळात रोहित्र बिघाडामुळे पाणीपुरवठा ठप्प


Water Supply Halted in Bhusawal Due to Transformer Breakdown भुसावळ (5 एप्रिल 2026) : वादळी पावसामुळे शहराचा वीजपुरवठा खंडित होताच जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत रोहित्रात बिघाड झाल्याने भुसावळकरांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागले. बुधवार, 1 रोजी रात्री 10 वाजेपासून तब्बल आठ तास वीजपुरवठा बंद राहिला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी सुमारे सात वाजता नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणारे 450 केव्हीएम क्षमतेचे रोहित्र अचानक निकामी झाल्याने शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी, गुरुवार सायंकाळपासून शहरातील कोणत्याही भागाला नियोजित रोटेशननुसार पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

दुहेरी संकटाच्या कात्रीत भुसावळकर
या दुहेरी संकटामुळे शहरातील नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला. जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केलेले पाणी शहरातील जलकुंभांपर्यंत पोहोचवण्यासाठी चार उच्च क्षमतेच्या पंपांचा वापर केला जातो. यात 75 एचपीचे दोन, 170 एचपीचे एक आणि 120 एचपीचे एक असे चार पंप कार्यरत आहेत. या सर्व पंपांना वीजपुरवठा करणारे मुख्य रोहित्रच नादुरुस्त झाल्याने संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली आणि पाणीपुरवठा पूर्णपणे बंद पडला.


वीजपुरवठ्याची समस्या गंभीर
दरम्यान, वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे वीजपुरवठ्यात कमी-अधिक दाब निर्माण झाल्याने रोहित्र निकामी झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. या घटनेची माहिती तत्काळ वीज वितरण कंपनीला देण्यात आली. कंपनीने पर्यायी म्हणून दुसरे रोहित्र उपलब्ध करून दिले; मात्र ते अपेक्षित 450 केव्हीएम क्षमतेचे नसून केवळ 200 केव्हीएम क्षमतेचे असल्याने आवश्यक तितका वीजपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे समस्या अधिकच वाढली.

रोटेशन झाले विस्कळीत
अखेर नगरपालिकेकडे राखीव ठेवण्यात आलेले 450 केव्हीएम क्षमतेचे रोहित्र बसविण्यात आले. शुक्रवार, 3 दुपारी सुमारे साडेतीन वाजता ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत शहरात टप्प्याटप्प्याने रोटेशननुसार पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र या सर्व प्रक्रियेमुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या बिघाडाचा थेट परिणाम शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर झाला असून आधी दहा दिवसांनी येणारे पाणी आता अकराव्या दिवशी मिळणार आहे. काही भागांमध्ये तर परिस्थिती अधिकच गंभीर असून जामनेर रोड परिसरातील काही नागरिकांना तब्बल 12 दिवसांपासून पाणी मिळाले नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे नागरिकांनी टँकरद्वारे पाणी मागवून आपली गरज भागवण्याचा पर्याय स्वीकारला.

पर्यायी यंत्रणा करावी सक्षम
पालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी या संपूर्ण घटनेमुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे रोटेशन किमान एक ते दोन दिवसांनी पुढे ढकलले गेले आहे. वारंवार होणार्‍या तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी टाळण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी आणि पर्यायी यंत्रणा सक्षम करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !