इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे अवयवदात्यांचा सत्कार
भुसावळ (6 एप्रिल 2026) : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे अवयवदान जनजागृती व अवयवदात्यांचा सत्कार सोहळा नुकताच करण्यात आला.
किडीनदानामुळे गरजू रुग्णांना नवजीवन
क्लबच्या अध्यक्षा सीमा सोनार यांनी किडनी दानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी किडनी दानामुळे गरजू रुग्णांना नवजीवन मिळते व त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळते, असे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, समाजामध्ये अवयवदानासाठी जनजागृतीची अत्यंत काळाची गरज आहे. एकाच किडनीवर निरोगी व्यक्ती आयुष्यभर अगदी सहज आपले दैनंदिन काम करू शकते. तसेच ब्रेन-डेड रुग्णांचे अवयव दान केल्यास 5 ते 8 जणांना जीवनदान मिळू शकते.


किडनीदान करणार्याचां सन्मान
प्रसंगी क्लबतर्फे दोन किडनी दात्यांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सुनीता सुनील चिरमाडे (जळगाव) यांनी आपल्या मुलाला किडनी देऊन त्याला नवजीवन दिले तर उज्वला प्रदीप धांडे यांनी आपल्या पतीला किडनी दान करून त्यांचे जीवन वाचवले.
या मान्यवरांचा सन्मान डॉ रश्मी शर्मा (इंटरनॅशनल इनरव्हील क्लबच्या ट्रेझरर) व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दोघींनीही अवयवदानाची ही चळवळ आजच्या काळाची अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन केले.
सीमा सोनार यांनीही स्वतः किडनी दान करून आपल्या मुलाला नवजीवन दिल्याचा अनुभव सांगितला. या अनुभवातून प्रेरित होऊन त्यांनी समाजात अवयवदानाबाबत जनजागृती करण्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमासाठी अध्यक्षा सीमा सोनार, सचिव योगीता वायकोळे , प्रोजेक्ट चेअरमन हेमलता सोनार तसेच सर्व क्लब सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात अवयवदात्यांचा गौरव करण्यात आला असून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.





