22 हजारांची लाच स्वीकारताना मुंबई माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष एसीबीच्या जाळ्यात


Divisional Chairman of Mumbai Secondary Education Board Caught in ACB Net While Accepting Bribe of ₹22,000 नवी मुंबई (8 एप्रिल 2026) : नवी मुंबईतील वाशी येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे (55) यांना 22 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने अटक केल्याने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली.

कमिशन स्वरुपात मागितली लाच
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला वाशी येथील मंडळाच्या कार्यालयातील विद्युत देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट 1 सप्टेंबर 2025 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी देण्यात आले होते. या कंत्राटांतर्गत नोव्हेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या चार महिन्यांचे सुमारे 3.16 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांनी 7 टक्के कमिशन म्हणून 22 हजार 176 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. ही लाचेची मागणी भांडार विभाग प्रमुख मनोहर पवार यांच्या मध्यस्थीने करण्यात आली होती.


कॅबिनमध्ये स्वीकारली लाच
25 मार्च रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीची 6 एप्रिल रोजी पडताळणी केल्यानंतर, मंगळवार, 7 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे त्यांच्याच केबिनमध्ये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कोण आहेत राजेंद्र अहिरे?
राजेंद्र अहिरे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात विविध महत्त्वपूर्ण पदांवर कार्यरत असून त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात मुंबई विभागात शिक्षण निरीक्षक म्हणून केली होती. त्यानंतरच्या काळात त्यांनी राज्य मंडळाच्या नाशिक विभागाचे विभागीय सचिव, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय शिक्षण उपसंचालक अशा विविध जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. सध्या ते राज्य मंडळाच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !