रक्षकच बनले भक्षक : पोलीस उपनिरीक्षक, रील स्टार महिला पोलिसासह तिघांविरोधात खंडणीचा गुन्हा
Guardians Turn Predators: Extortion Case Filed Against Three—Including a Police Sub-Inspector and a ‘Reel Star’ Female Constable पुणे (9 एप्रिल 2026) : पोस्कोचा गुन्हा दाखल होण्याची भीती घालत पुण्यातील एका नामांकित संस्थेच्या महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करून सात लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचार्यांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजित बडे, सोनाली हिंगे, सुदाम तायडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपनिरीक्षक अजित बडे हे सध्या सायबर पोलीस स्टेशनला तर सोनाली हिंगे या पोलीस दामिनी मार्शल असून शिवाजीनगर पोलीस स्टेशनला कार्यरत असून त्या प्रसिद्ध रील स्टार देखील आहेत तसेच सुदाम तायडे यांची शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे नेमणूक करण्यात आली आहे.

असे आहे खंडणी प्रकरण
पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या महिला प्राचार्याला या तिघांनी संगनमताने जाळ्यात ओढले. तुमच्यावर ‘पॉक्सो’ (बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला अटक केली जाईल, अशी भीती या पोलिसांनी दाखवली. पोलीस असल्याचे सांगून कायदेशीर कारवाईची प्रचंड दहशत निर्माण केली आणि प्रकरण मिटवण्यासाठी सात लाख रुपयांची मागणी केली. अटकेच्या आणि बदनामीच्या भीतीने पीडित प्राचार्यांनी ही रक्कम या पोलिसांना दिली मात्र हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडे धाव घेतली.
पोलीस आयुक्तांची ‘मोठी कारवाई’
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे ही तक्रार प्राप्त होताच, त्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक चौकशीत पोलिसांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी कडक भूमिका घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यामध्ये विशेषतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली आणि सोशल मीडियावर ’रील स्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेली महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे हिचा समावेश असल्याने चर्चांना उधाण आले आहे.






