भुसावळ बसस्थानकाचे अनेक वर्षानंतर उजळले ‘भाग्य’ ; डांबरीकरणाला सुरुवात

जीवघेण्या खड्ड्यातून प्रवाशांची होणार सुटका : आता टच अप पॉईंटचा तिढा सुटण्याची अपेक्षा


Bhusawal Bus Stand’s ‘Fortunes’ Shine After Many Years; Asphalt Paving Begins भुसावळ (9 एप्रिल 2026) : सातत्याने प्रवाशांमधून व्यक्त होत असलेली व गैरसोय लक्षात घेता भुसावळ बसस्थानकाच्या परिसरातील तब्बल 3500 स्क्वेअर मीटर भागात डांबरीकरणाचे काम एसटी महामंडळाच्या बांधकाम विभागाकडून युद्धपातळीवर सुरू झाले आहे. प्रवाशांसह चालक-वाहकांना मोठा दिलासा मिळाला असून वाहतूक कोंडी टळण्यासाठी आता नाहाटा जवळील टच अप पॉईंटही सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. बसस्थानकातील मोठ्या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुळीचा प्रचंड त्रास प्रवाशांना सहन करावा लागत होता.

निधी मंजूर मात्र कामाला खोडा
बसस्थानकाच्या डांबरीकरणाबाबत प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी होत होत्या. याची दखल घेत प्रशासनाने सुमारे 12 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून बसस्थानकाच्या आवारात डांबरीकरण केले जात आहे. सध्या सुरू असलेल्या कामाबाबत माहिती देताना महामंडळाचे अभियंता निलेश पाटील यांनी सांगितले की, हे काम पूर्ण होण्यासाठी किमान पाच दिवसांचा कालावधी लागेल. सद्यस्थितीत जमिनीचे सपाटीकरण करून त्यावर खडी टाकण्याचे काम केले जात आहे. दिवसा बसची ये-जा होत असल्याने रात्रीच्या वेळी हे काम केले जात आहे.


दोन टप्यात काम
बसस्थानकातील काम हे दोन टप्यात केले जात आहे, पहिला टप्पा हा खडीवर डांबराचा पहिला थर टाकून पृष्ठभाग मजबूत केला जाईल. दुसरा टप्पा हा डांबराचा हा थर सेट झाल्यानंतर, साधारण 15 दिवसांनी त्यावर पुन्हा एकदा डांबराचा अंतिम फिनिशिंग थर दिला जाईल, जेणेकरून रस्ता दीर्घकाळ टिकेल.

प्रवाशांची गैरसोय दूर होणार
बसस्थानकातील खड्ड्यांमुळे गाड्यांचेही नुकसान होत होते आणि प्रवाशांनाही चालणे कठीण झाले होते. आता 12 लाखांच्या कामामुळे परिसराचा कायापालट होईल. प्रवाशांच्या सोयीसाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात प्रवाशांचे होणारे हाल थांबणार असल्याचे आहे. एसटी बांधकाम विभागाचे अभियंता निलेश पाटील म्हणाले.

प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण
जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे जंक्शन असलेल्या भुसावळ बसस्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने एसटी प्रेमी आणि प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. डांबरीकरणामुळे बसस्थानक चकाचक होणार असून धुळीच्या त्रासापासून ज्येष्ठ नागरिक आणि बालकांना दिलासा मिळणार आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !