सातत्य व सकारात्मकता असेल तर यश नक्कीच मिळते : कवी दिनेश चव्हाण
भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये बक्षीस वितरण
If there is consistency and positivity, success is certain : Poet Dinesh Chavan चाळीसगाव (9 एप्रिल 2026) : अंगभूत कलागुण आपली ओळख करून देत असतात. सातत्य,चिकाटी व सकारात्मकता अंगी असेल तर यश लांब नाही, स्पर्धेत उतरा, अपयशाला सामोरे जा, यशाची पायरी चढण्यासाठी कष्टाचे पहाड सर करावे लागतात, कुठलीही कला ही तुमची ओळख बनावी यासाठी प्रयत्न करा, आई वडील व शिक्षक हे त्रिनेत्र तुम्हाला जीवनाची कुठलीही परीक्षा सर करण्यासाठी नेहमी तुमच्यासोबत भक्कम उभे आहेत, जीवनात काही अडचणी, समस्या जाणवल्यास त्यांचे मार्गदर्शन घ्या, असे मौलिक विचार चाळीसगाव येथील चित्रकार, कवी, साहित्यिक दिनेश चव्हाण यांनी मांडले, तेभास्कराचार्य इंटरनॅशनल स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये रंगोत्सव सेलिब्रेशन आणि बक्षीस वितरण समारंभात बोलत होते.
यांची होती उपस्थिती
अतिशय देखणा व सुरेख व शिस्तबद्ध असा हा कार्यक्रम भूषण मंगल कार्यालयात झाला. यावेळी चित्रकार दिनेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रंगोत्सव राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय पातळीवर यशस्वी विद्यार्थ्यांना दिनेश चव्हाण यांच्याहस्ते गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका श्रद्धा ठाकूर, आरती हमलाई तसेच उपमुख्याध्यापिका सीमा वर्मा, कला शिक्षक प्रमोद पाटील, अश्विनी कोळी, पूजा प्रसन्न अहिरे आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या. या रंगारंग सोहळ्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर यांचे सहकार्य लाभले. यावेळी जवळपास दीडशे विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गौरव सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शिल्ड, गिफ्ट व वस्तूरूप स्वरूपात कार्यक्रम प्रमुख चित्रकार दिनेश चव्हाण यांच्याहस्ते गौरविण्यात आले.







