भुसावळात फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना निवेदन
भुसावळ (9 एप्रिल 2026) : शहरात वाहनांवर लावल्या जाणार्या फॅन्सी नंबर प्लेटचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे शहर वाहतूक शाखेकडे याबाबत लेखी तक्रार करण्यात आली आहे. नियमबाह्य फॉन्ट, स्टिकर किंवा पेंट केलेल्या नंबर प्लेटमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या नियमांनुसार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अनिवार्य आहे. मात्र शहरात अनेक दुचाकी, तिनचाकी आणि चारचाकी वाहनांवर फॅन्सी अक्षरे,डिझाईन व स्टिकरयुक्त नंबर प्लेट दिसून येत असल्याने कायद्याप्रमाणे कारवाई करण्याची मागणी केली. वाहनधारकांवर तात्काळ कारवाई करून नियमबाह्य नंबर प्लेट काढून टाकाव्यात. तसेच सर्व वाहनधारकांनी प्रमाणित नंबर प्लेटच वापरणे बंधनकारक करण्यात यावे.

वाहतूक शाखेने योग्य कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.यामुळे वाहतूक शाखेने आता ठोस पावले उचलावी लागणार आहे. या निवेदनावर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेद्रसिंग पाटील, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष मो. मुन्नवर खान, सचीव प्रविण सुरवाडे, इस्माईल पहेलवान, नितीन पटाव आदींच्या स्वाक्षर्या आहे.






